वेगळ्या विदर्भावरुन सेनेचं तलवार म्यान,काँग्रेस-राष्ट्रवादीशी ‘युती’ही संपुष्टात

August 2, 2016 5:17 PM0 commentsViews:

02 ऑगस्ट : अखंड महाराष्ट्राच्या प्रश्नावर सभागृहात आक्रमक असलेल्या शिवसेनेनं आज आपली भूमिका मवाळ केलीये. अखंड महाराष्ट्राचा कुठलाही प्रस्ताव शिवसेना आणणार नाही असं स्पष्ट करत काँग्रेस राष्ट्रवादीच्या कुठल्याही प्रस्तावाला सेना पाठिंबा देणार नाही असं सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

sena_vs_ncpगेल्या चार दिवसांपासून वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरुन सत्ताधारी शिवसेनाही मैदानात उतरली. पण, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे’ असं स्पष्ट केल्यानं प्रश्न मिटला असं सांगत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी यू टर्न घेतलाय. अखंड महाराष्टाच्या बाबतीत काँग्रेस – राष्ट्रवादीची भूमिका प्रामाणिक नाही. त्यामुळे अखंड महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला शिकवू नये.अंखड महाराष्ट्राच्या मुद्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत युती संपुष्टात आलीये अशी घोषणाच शिंदे यांनी केलीये.

अखंड महाराष्ट्राच्या बाबतीत कधीही तडजोड नाही. महाराष्ट्र तोडणार्‍याची गय करणार नाही आणि महाराष्ट्र तोडण्याची भाषा कुणीही करू नये. अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर सत्ता सोडू, पण महाराष्ट्र तोडू देणार नाही असंही शिंदे यांनी ठणकावून सांगितलं. विशेष म्हणजे, या आधी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र बैठक करत खलबतं केली. तीनही पक्ष भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चाही रंगली. याबाबत उद्धव ठाकरेंशी सेना नेत्यांनी चर्चाही केली. मात्र बैठक संपल्यानंतर सर्व चर्चा हवेतच विरली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close