चंद्रकांत पाटलांवर 302चा गुन्हा दाखल करा, अजित पवारांची मागणी

August 3, 2016 1:23 PM0 commentsViews:

ajit_pawar--621x414

03 ऑगस्ट :  मुंबई-गोवा महामार्गावरील राजेवाडी फाट्याजवळील जुना पूल वाहून गेल्याचे तीव्र पडसाद आज (बुधवारी) विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवेदनाने समाधान न झाल्याने या प्रकरणात चंद्रकांत पाटलांवरच हत्येचा (302) गुन्हा दाखल करा, अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली.

हा पूल पडणे हे सर्वस्वी राज्य सरकारचे अपयश आहे. नवा पूल बांधलेला असताना, जुना पूल वाहतुकीसाठी बंद का करण्यात आला नाही. जर तो पूल वाहतुकीसाठी बंद केला असता, तर आज या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या लोकांचे प्राण वाचले असते, असंही अजित पवार यांनी सरकारला सुनावले. तसंच जर मेमध्ये त्या पूलाची तपासणी झाली होती आणि तो वाहतुकीसाठी योग्य असल्याचं ठरवण्यात आलं होतं, तर मग ऑगस्टमध्ये तो कसा काय कोसळतो, असा सवाल अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. आम्ही सत्तेवर असताना विरोधकांकडून सातत्याने आमच्यावर 302चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जायची. आता आम्ही पण ही मागणी करतो आहोत, असंही त्यांनी सभागृहात सांगितले.

दरम्यान, घटनास्थळी मदतकार्य सुरू असून, या प्रकरणी सरकार सतर्क असल्याचं निवेदन चंद्रकांत पाटील यांनी केलं. या संपूर्ण प्रकरणाची लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा सूचना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकार दिल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close