महाड दुर्घटना: तीन मृतदेह आढळले

August 4, 2016 10:23 AM0 commentsViews:

SS kamble12

महाड – 04 ऑगस्ट : महाड दुर्घटनेला 36 तास उलटून गेल्यानंतर आज दापोलीतील आंजर्ले, श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि महाड इथल्या केंबुर्ली इथे एकूण तीन मृतदेह आढळून आले असून हे मृतदेह सावित्री नदीवरील पुलासोबत कोसळलेल्या एसटी बस आणि अन्य वाहनांमधील असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आंजर्ले समुद्रकिनार्‍यावर आढळलेला मृतदेह महाड दुर्घटनेत वाहून गेलेल्या जयगड-मुंबई बसचे चालक एस. एस. कांबळे यांचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंगावर खाकी युनिफॉर्म आणि 8234 क्रमांकाचा बॅच असल्याने एसटी महामंडळ आणि नातेवाईकांकडे अधिक चौकशी केल्यानंतरच हा मृतदेह कांबळे यांचा आहे की नाही, याचा उलगडा होऊ शकणार आहे.

तर दुसरा मृतदेह घटनास्थळापासून 80 किलोमीटर अंतरावर हरिहरेश्वर समुद्रकिनारी सापडला आहे. पाठोपाठच महामडमधील केंबुर्ली गावात सावित्री नदीच्या पात्रामध्ये आणखी एक मृतदेह सापडला आहे. हरिहरेश्वरमध्ये सापडलेला मृतदेह शेवंती मिरगळ यांचा आहे. तर केंबुर्लीत सापडलेला मृतदेह रंजना वझे यांचा आहे. या दोघीही मायलेकी असून त्या मुंबईतल्या वाकोल्याच्या आहेत. दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या तवेरा गाडीतून त्या प्रवास करीत होत्या.

दरम्यान, सावित्री नदी हरिहरेश्वर इथल्या समुद्राला जाऊन मिळत असल्याने आणि तिथे एक मृतदेह आढळून आल्याने त्या भागावर मदत पथकांनी लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close