महाड दुर्घटना : एसटी बसचे अवशेष सापडले, मृतांची संख्या 24 वर

August 6, 2016 2:36 PM0 commentsViews:

Mahad213421

LIVE UPDATE : 

 • महाडमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस, पुन्हा शोधकार्यात अडथळे येण्याची शक्यता आहे
 • महाड दुर्घटनेत आज 2 जणांचे मृतदेह सापडले
 • आंबेत 24 वा मृतदेह स्थानिक मच्छीमारांना सापडला
 • दुसरा मृतदेह म्हाप्रळच्या खाडीत आढळला
 • 42 पैकी 24 मृतदेह सापडले, 18 अजूनही बेपत्ता
 • आज चौथ्या दिवशी म्हाप्रळ ब्रीज खालून एक मृतदेह वाहून गेलाय
 • कालही एक मृतदेह वाहून जाताना दिसला होता
 • म्हाप्रळमध्ये एनडीआरएफ किंवा दुसरी कोणती यंत्रणा नाहीय
 • ग्रामस्थांच्या नजरेसमोर हे 2 मृतदेह वाहून गेलेत
 • आता या मृतदेहांना पकडण्यासाठी स्थानिक बोट समुद्रात उतरलीय
 • महाड दुर्घटना : नवीन तंत्रज्ञान वापरणार, 3 कॅमेरे बोटींना बसवणार
 • 700 फूट खोल आणि 400 फूट रुंद पाण्याखालचं चित्रीकरण करणार

महाड – 06 ऑगस्ट : महाडमधील पूल दुर्घटनेतील आणखी दोन मृतदेह आज (शुक्रवारी) हाती लागले आहेत. एक मृतदेह आंबेतच्या खाडीत तर दुसरा मृतदेह म्हाप्रळच्या खाडीत आढळला. दरम्यान, घटनास्थळापासून तीन किलोमीटर अंतरावर नदीपात्रात नौदल पथकाला बेपत्ता एसटीचे काही अवशेष सापडले असून वाहून गेलेल्या दोन एसटी बस आणि अन्य कार याच परिसरात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आज आढळलेल्या दोन मृतदेहांपैकी एकाची ओळख पटली आहे. म्हाप्रळच्या खाडीत सापडलेला मृतदेह तवेरा कारमधून प्रवास करणार्‍या दिनेश कांबळी यांचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर आंबेत खाडीत मासेमारी करणार्‍या मच्छिमारांना सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. त्यासाठी नातेवाईकांनाही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुर्घटनेनंतर गेल्या चार दिवसांपासून सावित्रीच्या नदीपात्रात शोधमोहीम सुरू असून आतापर्यंत एकूण 24 मृतदेह आढळले आहेत. सरकारी अंदाजानुसार अजूनही एसटी बस आणि अन्य वाहनांमधील 18 जण बेपत्ता आहेत. त्यामुळे या मृतदेहांची शोधमोहीम सुरूच ठेवण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शोधमोहिमेत आता अमेरिकन तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे. पाण्यात खोलवर असलेली वस्तू याद्वारे शोधता येते, अशी माहीतीही शिंदे यांनी यावेळी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close