साहित्यातील निळी पहाट

April 10, 2010 4:46 PM0 commentsViews: 66

शिल्पा गाड, मुंबई महाराष्ट्राचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात दलित साहित्याला महत्वाचं स्थान आहे. याखेरीज दलित साहित्याच्या योगदानाची दखल भारतीय आणि जागतिक पातळीवरही घेतली गेली आहे. नामदेव ढसाळ….मराठी साहित्यातला बंडखोर लेखक…गोलपिठा या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहापासूनच त्यांच्यातील विद्रोहाची झलक दिसली. या विद्रोहाची पाळमुळं पार खोलवर पसरली होती… जगानं दिलेल्या अनुभवानं माझं बालपण करपून गेलं. आणि तिसरीत असल्यापासूनच मी कविता लिहायला लागलो, असं नामदेव ढसाळ सांगतात.याच विचारांनी ढसाळांसारख्या अनेकांना लिहितं केलं. बाबूराव बागुल, दया पवार यांसारख्या दलित लेखकांनी साहित्यविश्वाला आपल्या लेखनाने अक्षरश: हलवून सोडलं. आणि या सगळ्या विद्रोही लिखाणातूनच जन्म झाला तो साहित्य चळवळीचा.दलित साहित्याची चळवळ ही प्रामुख्याने प्रस्थापितांविरुद्धची चळवळ आहे. आम्ही लिहिणारी मंडळी होतो. या देशाचा स्वातंत्र्याचा विचार करणारे लोक होतो, असं ढसाळ सांगतात.दलित साहित्यातील सर्वात गाजलेला लेखनप्रकार म्हणजे आत्मकथन. आणि या आत्मकथनावर केवळ पुरुषांनीच नव्हे तर महिलांनीही ठसा उमटवला. मग त्या शांताबाई कृष्णाजी कांबळेंचं 'माज्या जल्माची चित्तरकथा' असो वा उर्मिला पवारांचं 'आयदान'…कोकणातील विषमतेचं चित्रण कुठेचआलं नव्हतं. माझ्या अनुभवातूनच आयदानचा जन्म झाला, असं उर्मिला पवार सांगतात.80च्या दशकात आणखी एका आत्मकथनानं साहित्य जग हलवून सोडलं. ते म्हणजे बलुतं. दगडू मारुती पवार हे दु:खानं गदगदणारं झाड बलुतंमधून समाजासमोर आलं… बलुतंला 'मदर ऑफ दलित ऑटोबायोग्राफी' असं म्हटलं जातं. अशा अनेक आत्मकथन असणार्‍या साहित्यकृती आज भारतीय तसंच परदेशी भाषांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत… उर्मिला पवार म्हणतात, जागतिक साहित्यात दलित साहित्याचं योगदान खूप मोठं आहे. कारण सर्वसामान्यांच्या आकांक्षा सांगणारं असं हे साहित्य आहे.जगणं आणि लिहिणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत हे जगाला दाखवून देणारं हे साहित्य आहे. नामदेव ढसाळांच्याच शब्दात सांगायचं तर विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन देणार…दलित मराठी साहित्याने फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेत मराठी साहित्याला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

close