सत्तेवरून हटवताच अरूणाचल प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांची आत्महत्या

August 9, 2016 12:30 PM0 commentsViews:

Kalikho-Pul-Banner

09 ऑगस्ट : अरूणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पूल हे मंगळवारी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले. सूत्रांच्या माहितीनुसार, कालिखो पूल यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची शक्यता आहे. मात्र, पोलिसांकडून या शक्यतेला अजूनही दुजोरा दिलेला नाही.

कलिखो पूल हे काँगेसचे नेते होते. त्यानंतर बंडखोर करत भाजपचे समर्थन घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं होतं. फेब्रुवारी 2016 ते जुलै 2016 या काळात त्यांनी अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भुषवलं होतं. मात्र, सुप्रिम कोर्टाने आदेश दिल्यानंतर सरकार बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी आत्महत्या केली आहे. मुख्यमंत्रीपद गेल्यापासून ते नैराश्याच्या गर्तेत होते, असं बोललं जातं आहे.

46 वर्षीय कालिखो पूल हे अरूणाचल प्रदेशचे 18 वे मुख्यमंत्री होते. पूल हे अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून वर आले होते. बालवयातच पालकांचे छत्र हरपल्यानंतर कालिको पूल यांना खूप संघर्ष करावा लागला. सुरूवातीच्या काळात त्यांनी सुतारकाम, फर्निचर विक्रीचे आणि रखवालदाराचे काम केलं. या संघर्षमय प्रवासानंतर त्यांनी राजकीय जीवनात मोठं यश मिळवलं होतं.त्यामुळे अशा व्यक्तीनं आत्महत्या केली यावर त्यांच्या समर्थकांचा विश्वास बसत नाहीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close