तब्बल 16 वर्षांनंतर इरोम शर्मिला यांनी उपोषण सोडलं

August 9, 2016 5:37 PM0 commentsViews:

irom_sharmila309 ऑगस्ट : मणिपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी तब्बल 16 वर्षांनंतर आपलं उपोषण सोडलंय. लष्कराला दिलेल्या विशेषाधिकाराविरोधात इरोम शर्मिला यांचा लढा सुरू होता. आज त्यांनी आपलं उपोषण सोडत मणिपूरच्या मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली.

44 वर्षीय इरोम शर्मिला यांनी आज न्यायालयाच्या कोठडीत उपोषण सोडलं. उपोषण सोडल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीतून मुक्तता करण्यात आलीये. इरोम शर्मिला यांनी तब्बल 16 वर्षं अन्नपाण्याचा त्याग केला होता. त्यामुळे सरकारने त्यांच्या अन्ननलिकेत नळी सोडून त्यांना लिक्विड स्वरूपात पोषक घटक पुरवण्यात येत होते. त्यांचा हा लढा जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. आता यापुढे राजकारणामध्ये उतरून मुख्यमंत्री होण्याची इरोम शर्मिला यांनी इच्छा व्यक्त केलीये. तसंच माझी शिक्षा फारच कमी आहे पण मला सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी लढा द्यायचाय.माझं पहिलं काम हे आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स कायदा रद्द करणे असणार आहे. जोपर्यंत मला योग्य दिशा मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या आईला भेटणार नाही असा निर्धारही त्यांनी केला. तसंच शर्मिला यांनी लग्न करण्याची इच्छाही बोलून दाखवली.

इरोम शर्मिलांचा लढा

2 नोव्हेंबर 2000 रोजी लष्कराने 10 नागरिकांची हत्या केली होती. त्यामुळे लष्काराला देण्यात आलेल्या आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी इरोम शर्मिला यांनी उपोषण सुरू केलं होतं. गेली 16 वर्ष त्यांना नळ्यांद्वारे जबरदस्तीने अन्न देण्यात येत होतं. उपोषणाच्या तिसर्‍याच दिवशी मणिपूर सरकारने इरोम शर्मिला यांच्यावर आत्महत्या करण्याचा आरोप ठेवून अटक केली होती. पण इरोम शर्मिला मागे हटल्या नाहीत. त्यांना अनेक वेळा उपोषण सोडण्यास विनंती करण्यात आली. पण आपल्या निर्णयावर त्या ठाम राहिल्यात. त्यांना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि तिथेच त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. आज त्यांची या 16 वर्षांच्या लढ्यातून एकाप्रकारे सुटका करण्यात आलीये. पण लढा कायम राहणार असा निर्धार इरोम यांनी केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close