राष्ट्रवादीने गड राखला

April 12, 2010 8:31 AM0 commentsViews: 2

12 एप्रिलनवी मुंबईत सलग तिसर्‍यांदा राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत बहुमतासाठी लागणार्‍या 45 जागा जिंकल्या आहेत. इथे काँग्रेससोबत आघाडी न करण्याची गणेश नाईक यांची भूमिका योग्य ठरली आहे. तर काँग्रेसला मात्र पराभवाचा धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रचार केलेले शशिकांत भोईर, काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत आणि रमाकांत म्हात्रे हे तिन्हीही उमेदवार पराभूत झाले आहेत. मनसेने इथे अजूनही खाते उघडलेले नाही. पक्षातर्फे इथे 69 उमेदवार उभे करण्यात आले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्या हातात पुढील पाच वर्षे पुन्हा एकदा महापालिकेची सत्ता राहणार आहे. तर काँग्रेसची अवस्था केवीलवाणी झाली आहे. मातब्बर नेत्यांचा पराभव झाल्याने आता अगदी सभागृहात बोलण्यासाठीसुद्धा काँग्रेसकडे चांगला नेता राहिलेला नाही. विशेष म्हणजे इथे शिवसेनेला फारसा फटका बसलेला नाही. फुटीचे वातावरण असतानाही 13 जण निवडून आणत सेनेने आपला प्रभाव दाखवून दिला आहे. विशेषत: शिवसेनेचे विजय चौगुले यांच्यामुळे कोपरखैरणे, अहिरोली परिसरात शिवसेनेला यश मिळाले आहे. शिवसेनेने काँग्रेसपेक्षाही या निवडणुकीत सरस कामगिरी केली आहे. एक नजर टाकूयात पालिकेत कोणाला किती जागा मिळाल्या त्यावर… काँग्रेस – 12 राष्ट्रवादी – 55शिवसेना – 16 भाजप – 1मनसे- 0 अपक्ष – 4

close