महाराष्ट्राला येथेच्छ न्हाऊ घालणार्‍या पावसाची खान्देशकडे मात्र पाठ !

August 11, 2016 12:22 PM0 commentsViews:

दीपक बोरसे, धुळे

11 ऑगस्ट :   सार्‍या महाराष्ट्राला येथेच्छ न्हाऊ घालणार्‍या पावसाने खान्देशाकडे मात्र पाठ फिरवल्याचे चित्र आहे. धुळे जिल्ह्यात सरासरी इतकाही पाऊस पडलेला नाही. जिल्हा प्रशासनाचे दररोज येणारे अतिवृष्टीचे इशारेही आता खान्देशात विनोदाचा विषय ठरला आहे. तापी वगळता खान्देशातील सर्व नद्या ह्या अजून कोरड्या आहेत. नदी नाल्याना अजून एकही पूर आला नसल्याने भूजल पातळीही वाढलेली नाही.

5538944-1

राज्यात सगळीकडे पाऊस धो धो बरसत आहे. पण खान्देशात मात्र अजूनही बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेतच आहे. धुळे जिल्ह्यात पेरण्या तर झाल्या आहेत. पण अजूनतरी फक्त हे उगवलेलं तग धरू शकतं इतकाच पाऊस आहे. धुळे जिल्ह्यात तर पाऊसाने सरासरीही गाठलेली नाही. जमिनीत वरच्या वर ओल टिकेल इतकाच पाऊस झालाय. त्यामुळे भूजल पातळीही वाढलेली नाही. विहिरी अजूनही तळ गाठून आहेत. रिमझिम पडणार्‍या पावसाच्या आधारे शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे, मशागतही सुरू आहे. मात्र नदी नाले दुथडी भरणारा पाऊस मात्र अजूनही खान्देशात फिरकलाच नाही.

  • खान्देशात पाऊसाची अवकृपा

जिल्हा     सरासरी पाऊस   आतापर्यंतचा     पाऊस टक्केवारी
धुळे              677  मिमी         238 मिमी               41%
नंदुरबार       835 मिमी         337 मिमी               44%
जळगाव       663 मिमी        377 मिमी                57%

दररोज आकाशात पावसाच्या ढगांची होणारी गर्दी, प्रचंड उकाडा आणि दररोज मुसळधार पाऊस पडेल असं वातावरण तर धुळ्यात होतं. पण फक्त रिमझिम सरींपलिकडे पाऊस पडतच नाही. त्यातल्या त्यात दिलासा इतकाच की पिकं सध्या तरी हिरवीगार दिसतायेत. पण ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाच्या दररोजच्या अतिवृष्टीचा इशार्‍याचं गांभीर्यच संपलं आहे

खान्देशात पर्जन्यराजा अजूनही रुसून आहे. नुसतं दर्शन देऊन तो गायब झाला आहे. आता अंत न पाहता लवकर धो धो बरस रे बाबा अशी साद आता खान्देशातला बळीराजा पावसाला घालत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close