मढवीचा ‘आयबीएन-लोकमत’च्या टीमवर हल्ल्याचा प्रयत्न

April 12, 2010 11:31 AM0 commentsViews: 4

12 एप्रिलनवी मुंबई महापालिकेतील भ्रष्ट नगरसेवक आणि आज महापालिका निवडणुकीत पुन्हा निवडून आलेला एम. के मढवी याने 'आयबीएन-लोकमत'च्या टीमवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मढवी आणि त्याच्या साथीदारांच्या या हल्ल्याच्या प्रयत्नात कोणीही जखमी झाले नाही. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कंत्राटामध्ये मढवीने केलेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश 'आयबीएन-लोकमत'ने केला होता. त्यामुळे त्याला कारवाईला सामोरे जावे लागले होते. त्यातूनच त्याने 'आयबीएन-लोकमत'चे नवी मुंबईचे रिपोर्टर विनय म्हात्रे यांच्यावर राग धरला होता. आज वॉर्ड क्रमांक 13मधून विजयी झाल्यानंतर जल्लोष करणार्‍या कार्यर्त्यांसह तो राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील 'व्हाईट हाऊस' या निवास्थानी आला. तेथे नाईक यांची मुलाखत घेण्यासाठी आलेली 'आयबीएन-लोकमत'ची टीम पाहताच त्याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. विशेष म्हणजे नुकत्याच निवडून आलेल्या मढवीच्या पत्नीनेही यावेळी शिवीगाळ केली. घोटाळ्याचा दोष माथ्यावर आल्यावर मढवीने अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविली. त्याला राष्ट्रवादीने पाठींबा दिला होता. अतिक्रमण विभागाला यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ पुरवण्याचे काम मढवी करत होता. त्यात त्याने दुप्पट, तिप्पट बीले लावली होती. तसेच बोगस चलने सादर करून कोट्यवधींचा घोटाळा केला होता. याप्रकरणी महापालिकेच्या पाच अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यात मढवीच्या भावालाही अटक झाली होती. हा सर्व प्रकार 'आयबीएन-लोकमत'ने जनतेसमोर आणला होता. याचाच राग धरून मढवीने आज हा हल्ल्याचा प्रकार केला. यावेळी गणेश नाईक आणि खासदार संजीव नाईक यांनी त्याला फैलावर घेतले. पण तरीही 'तुला पाहून घेईन' अशी धमकी त्याने विनय म्हात्रे यांना दिली.

close