सहा तासांनंतर प्रवाशांचा ‘रेलरोको’ मागे; मध्यरेल्वे पूर्ववत

August 12, 2016 9:03 AM0 commentsViews:

Badlapur railroko

बदलापूर – 11 ऑगस्ट : बदलापूर रेल्वे स्थानकात सीएसटी लोकल 20 मिनिटं उशिरा आल्यानं संतप्त प्रवाशांनी छेडलेलं उस्फूर्त आंदोलन अखेर सहा तासांनंतर मागे घेतलं आहे. प्रवाशांच्या आंदोलनामुळं कोलमडलेली मध्यरेल्वेची वाहतूक तब्बल सहा तासांनंतर सुरू झाली आहे.

रेल्वे ट्रॅकमध्ये उतरलेल्या शेकडो संतप्त प्रवाशांनी आपला मोर्चा स्टेशन मास्तरच्या कार्यालयाकडे वळवत स्टेशन मास्तरला घेराव घातला. या आंदोलनामुळं ऑफिसमध्ये पोहोचण्यास आधीच उशीर झालेले चाकरमानी कामावर रूजू होऊ शकले नाहीत.

भिवपुरी स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने बदलापूर स्टेशनवर 5 वाजून 5 मिनिटांनी येणारी सीएसटी गाडी तब्बल 20 मिनिटं उशिरानं आली. भल्या पहाटे गाडीची वाट पाहणार्‍या प्रवाशांचा संयम सुटल्यानं शेकडो संतप्त प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उतरत उशिरा आलेली सीएसटी गाडी स्टेशनवरच अडवून धरत उस्फुर्त आंदोलन छेडलं. काही प्रवाशांनी मोटरमनच्या केबिनचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोटरमनने कॅबिन सोडून देत प्रवाशांच्या तावडीतून कशीबशी आपली सूटका करून घेतली.

इतक्यावरच न थांबता या संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मास्तरचं कार्यालय गाठत स्टेशन मास्तरला धेराव घातला. यापुढे गाडी वेळेवर येईल असं लिहून द्या तरच आंदोलन मागे घेण्यात येईल असा आग्रह या आंदोलक प्रवाशांनी स्टेशन मास्तरकडे धरला.

या संतप्त प्रवाशांनी पुढे कर्जतकडे जाणारी गाडीही बदलापूरस स्टेशनमध्ये अडवून धरल्याने अप आणि डाउन अशा दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

प्रवाशांच्या आंदोलनामुळं कल्याण ते कर्जत स्टेशनदरम्यान दोन्ही अप आणि डाउन अशा दोन्ही मार्गावरील गाड्या थांबवण्यात आल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जीआरपी आणि आरपीएफचे जवान तैनात करण्यात आले.

मुंबई-पुणेइंटरसिटी एक्सप्रेसही अडवली

गाडीची वाट पाहट ताटकळत असलेल्या प्रवाशांनी संतप्त होत कर्जत स्टेशनदरम्यान मुंबईहून पुण्याला जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस थांबवत आपले आंदोलन अधिक तिव्र केले. या आंदोलनामुळे मुंबईबाहेर जाणार्‍या प्रवाशांचा देखील खोळंबा झाला होता.

रेल्वे मंत्र्यांचे आदोलन मागे घेण्याचे आवाहन

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संतप्त प्रवाशांच्या या आंदोलनाची तातडीनं दखल घेत प्रवाशांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहनही केलं. याबरोबर झालेला तांत्रिक बिघाड युद्ध पातळीवर दुरूस्त करावा असे आदेशही त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close