रस्त्याचा बळी, चिमुकलीने आईच्या कुशीत सोडला जीव

August 12, 2016 7:17 PM1 commentViews:

पंकज क्षीरसागर, परभणी 12 ऑगस्ट : शहरातल्या रस्त्यांवर खड्डे असल्याचं चित्र नेहमीच पाहायला मिळतंय…पण आजही आपल्या राज्यात अशी अनेक गावं आहेत जिथे रस्ताच नाहीये. इतकंच नाही तर रस्ता नसणं या गावातल्या गावकर्‍यांच्या जीवावर बेततंय. परभणीत कौंडगावमध्ये एका सहा वर्षांच्या मुलीचाही असाच जीव गेलाय. वेळेवर कारवाई केली नाही तर 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा गावकर्‍यांनी दिलाय.parbhani_news3

मुसळधार पावसामुळे परभणीतल्या जिंतूर तालुक्यातल्या कोडगावमधला रस्त्याची झालेली ही अवस्था…रस्ता आहे की चिखलाचा डोंगर असा प्रश्न पडतो..आणि याच भयानक अवस्थेमुळे सहा वर्षांच्या प्रियांकाचा जीव गेलाय. पाऊस पडल्यानंतर या रस्त्याच्या अवस्थेमुळे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटतो. अशावेळेस प्रियांका नागरे या लहानगीला ताप आला. तिला उपचारासाठी तालुक्याला नेणं आवश्यक होतं. त्यासाठी गावकर्‍यांनी भर पावसात ट्रॅक्टरही काढला. पण कंबरेएवढ्या चिखलात हा ट्रॅक्टर फसला…तो काढण्यात इतका वेळ गेला की तोपर्यंत या लहानगीनं जीव सोडला होता. अक्षरश: सर्वांसमोर तडफडून प्रियांकाचा जीव गेल्यानं गावकरी संतापले आहे. तिच्या आईच्या दु:खाला तर सीमाच नाहीये.

बाराशे लोकवस्तीचं कौडगावच्या एका बाजूला नदी आहे आणि दुसर्‍या बाजूनं तीन किलोमीटरचा कच्चा रस्ता…दर पावसाळ्यात इथल्या रस्त्याची ही अशीच अवस्था होते. पण आता जर लक्ष दिलं नाही तर 15 ऑगस्टला या गावकर्‍यांनी आत्महदहनाचा इशारा दिलाय.

परभणी जिल्ह्यात 840 ग्राम पंचायती आहेत. तर 150 वाडी तांडे आहेत. यापैकी 500 ग्रामपंचायतींना गाव रस्ताच नाहीये. वाडी तांड्याचे हाल तर विचारायलाच नको. दिवस भरलेली गर्भवती महिला असो किंवा गंभीर आजारी…वेळेवर उपचार मिळेपर्यंत अक्षरश: त्यांचा जीव टांगणीला लागतो. पण अधिकारी असो की लोकप्रतिनिधी सगळेच इकडे दुर्लक्ष करतायेत किंवा मग चालढकल तरी…

केवळ वेळेवर उपचार देण्यासाठी पोहोचू शकत नाही म्हणून आपल्या समोर लहान लेकराचा जीव जाताना बघणं हे किती भयानक असू
शकतं याची कल्पनाही करता येत नाही. वारंवार विनंत्या, मागण्या करूनही जर हक्काचा साधा रस्ताही या गावकर्‍यांना मिळत नसेल तर मग इतर सुविधांबद्दल विचार तरी कसा करायचा?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close