आता रेल्वे प्रशासनाचा ‘बदला’पूर,आंदोलकांवर गुन्हे दाखल

August 12, 2016 10:47 PM0 commentsViews:

12 ऑगस्ट : रोज काही ना काही कारणानं रखडणार्‍या मध्य रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या संतापाचा सामना करावा लागला. बदलापूरमध्ये प्रवाशांनी तब्बल सहा तास रास्ता रोको केला. या आंदोलनाच्या निमित्तानं आपल्या संतापाला प्रवाशांनी मोकळी वाट करुन दिली. पण, आंदोलक प्रवाशांना मध्य रेल्वेनं समाजकंटक ठरवलंय. या सर्व आंदोलकांवर गुन्हे दाखल करणार्‍यात आले असून सीसीटीव्ही फूटेज तपासणे सुरू आहे. त्यामुळे आंदोलकांना अटक होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेवर वाहतुकीचा खेळखंडोबा सुरूच असतो. प्रवाशांच्या मनातल्या या संतापाचा उद्रेक बदलापुरात झाला. पहाटे पाच वाजून पाच मिनिटांची लोकल उशिरा आल्यानं काही प्रवासी रेल्वे रुळांवर उतरले. रेल्वेविरोधात जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली. प्रवाशांनी बदलापूरहून कर्जतकडे आणि सीएसटीकडं जाणारे दोन्ही मार्ग अडवून धरले. प्रवाशांच्या आक्रोशाला पारावार नव्हता. मध्य रेल्वेच्या रडगाण्याला कंटाळून अनेक महिलाही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सकाळी आठपर्यंत हजारो प्रवाशांची गर्दी रेल्वे स्टेशनवर झाली होती. प्रवासी रेल्वेच्या नावानं शिव्यांची लाखोली वाहत होते.badalapur_rail_roko (2)

गर्दी जशी वाढत गेली तसा आंदोलकांचा आवेश वाढला होता. रेल्वेचे अधिकारी बॅकफूटवर आले होते. पोलीस अधिकारी आंदोलकांशी चर्चा करीत होते. स्टेशन मास्तरांनी दोन वेळा लिहून दिल्यानंतरही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

बदलापूरच्या रेल रोकोमुळे रेल्वे वाहतुकीचा बोर्‍या वाजला होता. कल्याणहून खोपोलीकडे जाणारी लोकल वाहतूक ठप्प होती. तर मेल एक्स्प्रेसही ठिकठिकाणी खोळंबल्या होत्या.

कर्जतमध्येही प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला होता. प्रवाशांनी कर्जत स्टेशनमध्ये सिंहग़ड एक्स्प्रेस रोखून धरली होती. या आंदोलनाची दखल केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना घ्यावी लागली. त्यांनी प्रवाशांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. शिवाय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही घटनास्थळी रवाना केलं. रेल्वेचे महाव्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी भेटण्याचं आश्वासन दिल्यानंतर रेल्वे रुळांवरुन प्रवासी हटले.

रेल्वेचे महाव्यवस्थापक अमिताभ ओझा आले त्यांनी प्रवाशांच्या अडचणी ऐकून घेतल्या. मात्र आंदोलनात काही समाजकंटक घुसल्याचा जावईशोध त्यांनी लावला. मात्र त्यांचं हे वक्तव्य अमिताभ ओझा यांना चांगलंच भोवलंय. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अभिताभ ओझा यांचं हे वक्तव्य प्रवाश्यांचा भावनांची थट्टा करणारं असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात होत्या. हे होत नाही तेच रेल्वे प्रशासनाने आता बदला काढला. तब्बल सहा तास लोकल रोखून धरणार्‍या आंदोलकांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रेल्वे कायद्या प्रमाणे 145,146,153,154 या कालामांतर्गत गुन्हा दाखल झाला. बदलापूर आरपीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. या घटनेचे सर्व सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरू आहे. लवकर या आंदोलनकर्त्याना अटक होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, सहा तास चाललेल्या बदलापुरच्या आंदोलनात एकाही प्रवाशानं हातात दगड घेतला नाही. की रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान केलं नाही. रोजच्या प्रवासात भोगाव्या लागणार्‍या नरकयातनांना वाचा फोडण्यासाठी रुळांवर उतरलेला प्रवासी हा समाजकंटक कसा होऊ शकतो असा प्रश्न विचारला जातोय. बदलापूरचं आंदोलन ही फक्त प्रवाशांच्या संतापाची एक झलक होती. प्रवाशांच्या संयमाचा बांध फूटू देऊ नका हीच रेल्वेचे सर्वेसर्वा प्रभूंना विनंती..


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close