एमबीए तरुणांचा नोकरीला नकार, भरवला आठवडी बाजार !

August 16, 2016 9:33 AM0 commentsViews:

पुणे, 16 ऑगस्ट : एमबीए करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण पुण्यातल्या काही उच्चशिक्षित तरूणांनी शेतकर्‍यांसाठी काही करावं या उद्देशाने पुणे शहरात आठवडी बाजार भरवायला सुरूवात केलीये. यामुळे पुण्याजवळचे शेतकरी या बाजारात माल थेट आणून विकत आहे.

mba_student_new33एमबीएचं शिक्षण म्हणजे गलेलठ्ठ पगार असंच समीकरण बहुतेकांच्या मनात असतं. पण आपल्या या शिक्षणाचा फायदा शेतकर्‍यांना मिळावा यासाठी पुण्यात राजेश माने, नरेंद्र पवार गणेश सवाने, तुषार अग्रवाल आणि ऋतुराज जाधव या उच्चशिक्षित युवकांनी पुण्यात 2014 पासून आठवडी बाजार भरवायला सुरूवात केली. या बाजारामुळे शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतोय. पुण्याजवळच्या ग्रामीण भागातून अनेक शेतकरी आणि बचतगट या बाजारात आपला ताजा भाजीपाला खुडून आणतात. स्वामी समर्थ कंपनीतर्फे हा बाजार भरवला जातो.

पुण्यात बालेवाडीच्या दसरा चौकात दर गुरुवारी 3 वाजता हा आठवडे बाजार भरतो. याशिवाय पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आणखी 9 ठिकाणी हा बाजार भरतो. या बाजारात दर दिवशी 10 ते 12 लाखांची उलाढाल होते आणि स्वत:चा माल स्वत: विकण्याचा अधिकारही शेतकर्‍यांना मिळतो.

शेतकर्‍यांचे 60 बचतगट या बाजारात आपला माल आणतात आणि या बाजाराला पुणे कृषी पणन मंडळाकडूनही चांगला पाठिंबा मिळतोय.

ताजा आणि स्वच्छ भाजीपाला आणि फळं थेट मिळत असल्याने ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद या बाजाराला मिळतोय. अनेक ग्राहक
मॉलपेक्षा या बाजारात येऊन भाजीपाला खरेदी करत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आठवडे बाजार आयोजित करण्याविषयी मागणी वाढतेय. यामुळं राज्य सरकारचं शेतकरी आडतमुक्त धोरण खर्‍या अर्थानं साध्य होतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close