पोलिसांकडून वाचण्यासाठी किडनी रॅकेटमध्ये होत होता कोडवर्डस्‌चा वापर

August 16, 2016 9:56 PM0 commentsViews:

सूरज ओझा, मुंबई

मुंबईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये झालेल्या किडनी रॅकेट प्रकरणाचा तपास पोलीस करत होते. मात्र या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक आरोपींचं हे म्हणणं आहे की पोलिसांकडून वाचण्यासाठी किडनी दलाल हे खूपच सावध रहायचे आणि यासाठी ते वेगवेगळ्या कोडवर्डचा वापर करत होते.

Kidney transplan

मुंबईच्या किडनी रॅकेट प्रकरणात कोर्टाकडून आरोपी डॉक्टरांना न्यायलयीन कोठडी मिळाली आहे. सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, आरोपी त्यात किडनी एजंट, डोनर किंवा डॉक्टर्स हे आपआपसात बोलताना कोडवर्ड म्हणजे सांकेतिक भाषेचा वापर करायचे. जेणेकरून त्यांचा हा अवैधधंदा पोलिसांच्या नजरेस येऊ नये.

किडनी रॅकेटचे कोडवर्ड्स

  • किडनी म्हणजे राजमा कारण राजमाला इंग्रजीत किडनी बिन म्हणतात.
  • ब्लड ग्रुप म्हणजे सॉस कारण सॉस दिसायला रक्तासारखा असतो.
  • डॉक्युमेंट्स म्हणजे थाली याचा अर्थ थाली तयार आहे का?
  • डॉक्टर म्हणजे शेफ
  • किडनी खरेदी करणारा म्हणजे मेहमान
  • किडनी विकणारा म्हणजे बनिया
  • किडनी एजंट म्हणजे डिलिव्हरी बॉय
  • फायदा म्हणजे स्वाद
  • ट्रान्सप्लांटची प्रक्रिया म्हणजे खाना पकाना
  • हॉस्पिटल म्हणजे किचन कारण हॉस्पिटलमध्येच ट्रान्सप्लांटची प्रक्रिया व्हायची

मात्र हे किडनी रॅकेट उघडकीस आलं आणि अनेक जणांना अटक झाली. त्यामुळे या रॅकेटप्रकरणी जे कोडवर्ड वापरले जायचे ते आता डिकोड झाले आहेत. तर किडनी ट्रान्सप्लांटबाबत कायद्याच्या जाणकारांनी सांगितलं की,”किडनी ट्रान्सप्लांटची प्रक्रिया ही फार क्लिष्ट आहे. त्यामुळे हे दलाल पोलिसांपासून खूपच सावध राहत होते”.

किडनी रॅकेटच्या जाळ्यात आपली स्वतःची किडनी देऊन अडकलेला एक पीडित तरुण ह्या एजंटच्या संपर्कात होता. त्यानं सांगितलं की कसे हे एजंट एकमेकांशी बोलायचे.

‘एक मेहमान आहे. ज्याच्यासाठी राजमा शिजवायचा आहे. जर कोणी बनिया नजरेत असेल जो स्वस्त दरात राजमा देईल तर मुंबईच्या किचनचा एक शेफही तयार आहे. थाळीची काळजी करू नका. स्वाद चांगला होईल’. याचा अर्थ असा होतो की ‘एक माणूस आहे जो किडनी खरेदी करणार आहे. त्याला किडनी ट्रान्सप्लांट करून घ्यायचे आहे. जर कोणी किडनी विकणारा नजरेत असेल जो स्वस्तात आपली किडनी विकत असेल तर मुंबईच्या एका हॉस्पिटलचा डॉक्टर तयार आहे. डॉक्युमेंट्सची काळजी करू नका. आपल्याला चांगला फायदा होणार आहे.’

किडनी रॅकेट उघडकीस आल्यानंतर आतापर्यंत 14 लोकांना अटक झाली आहे. ह्या गंभीर प्रकरणात हिरानंदानी रुग्णालयाच्या सीईओ आणि मेडिकल डायरेक्टर असे एकूण 5 डॉक्टर अटकेत आहेत. तर आणखी 2 डॉक्टर्सवर अटकेची टांगती तलवार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close