लोकमंगलनं चुकीच्या पद्धतीनं पैसे गोळा केले, सहकारमंत्र्यांची कबुली

August 17, 2016 6:06 PM0 commentsViews:

सागर सुरवसे, सोलापूर

17 ऑगस्ट :  राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख सेबीच्या ताशेर्‍यांमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या मालकीच्या लोकमंगल उद्योग समुहावर सेबीने नियमबाह्य पद्धतीने शेअर्स गोळा केल्याचा ठपका ठेवला आहे. सुभाष देशमुखांनीही तात्काळ आपली चूक कबुल करत गुंतवणूकदारांचे सगळे पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे. पण या सगळ्या घोटाळ्याची तुलना थेट सुब्रतो रॉय यांच्या सहारा समुहाशी केली गेल्याने हे प्रकरण दिसतं नक्कीच सोपं नाही.

Subhash deshmukh

सहकारमंत्री सुभाष देशमुख सोलापुरातलं एक धंदेवाईक राजकीय नेतृत्वं, असं ते स्वतःच सांगताता. एक साधा कंत्राटदार ते राज्याचा सहकारमंत्री हा सुभाष देशमुखांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. लोकमंगल उद्योगसमुहाच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर आणि परिसरात मोठं आर्थिक साम्राज्य उभं केलं आहे. पण ही आर्थिक प्रगती साधताना त्यांनी सेबीचे नियमही बिनदिक्कतपणे पायदळी तुडवले आहेत. त्याचीच ही नोटीस.

या नोटीसीमध्ये सेबीने नेमका काय ठपका ठेवला?

  • लोकमंगल ऍग्रो कंपनीने साखर कारखान्यासाठी
  • 4 हजार 751 लोकांकडून 74 कोटी रुपये गोळा केले
  • 2009 ते 2015 या काळात लोकमंगलने हे पैसे गोळा केले
  • पण हे भाग भांडवल उभा करताना सेबीच्या नियमांची पायमल्ली
  • गुंतवणूकदारांना व्याजासकट पैसे परत देण्याचे सेबीचे आदेश

कारखान्यासाठी भागभांडवल उभारताना अनियमितता झाल्याचं स्वतः सुभाष देशमुखांनीही कबुल केलं आहे. लोकमंगल उद्योगसमुहाच्या या आर्थिक अनियमिततेची तुलना मात्र, सहारा समुहाशी केली जाणं सहकारमत्र्यांना मान्य नाही.

बघितलंत शेअर धारकांकडून भागभांडवल गोळा केल्याचं सहकारमंत्री मान्य करतात खरं ते नेमकं कोणत्या कारखान्यासाठी हे काही सांगत नाहीत. इथंच तर खरी लोकमंगलच्या आर्थिक उत्कर्षाची मेख लपलेली आहे. असो, पण आता थेट सेबीनेच ठपका ठेवल्याने सहकारमंत्री पुरते अडचणीत आलेत हेही तितकच खरं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close