रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले यश; साक्षी मलिकला ब्राँझमेडल

August 18, 2016 2:05 PM0 commentsViews:

BRKING940_201608181339_940x355

18 ऑगस्ट :  रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वहिले पदक मिळाले आहे. महिलांच्या कुस्ती स्पर्धेत 58 किलो वजनी गटात भारताच्या 23 वर्षांच्या साक्षी मलिकने किर्गिस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हवर 8-5 अशी मात करत ब्राँझ मेडलवर आपलं नाव कोरलं आहे.

सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर झालेल्या साक्षी मलिकच्या ब्राँझ मेडलच्या आशा जिवंत होत्या. साक्षीची मॅच सुरू होताच 0-5 अशा मोठ्या फरकाने ती मागे पडली होती. मॅचमध्ये ब्रेक जाहीर झाला आणि आखाड्याबाहेर विश्रांतीसाठी गेलेल्या साक्षीच्या कानात तिच्या प्रशिक्षकांनी काही गुरूमंत्र दिला. ब्रेकनंतर साक्षी एका वेगळ्याच निर्धाराने उतरली आणि एक-एक पॉईंट आपल्या खात्यात जमा करत गेली. साक्षीचे हे प्रयत्न पदक मिळवायला थोडक्यात कमी पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण शेवटच्या 10 सेकंदात मॅचचं रूप पालटलं. आपल्या अचूक डावपेचांच्या आधारे साक्षीने तिच्या प्रतिस्पर्धीला खाली पाडलं आणि मॅचच्या अगदी शेवटच्या क्षणांमध्ये 3 पॉईंट्सची कमाई करत ब्राँझ मेडलवर आपले नाव कोरलं.

मॅच आपल्या हातातून जातेय म्हटल्यावर किर्गिस्तानच्या कुस्तीपटूने साक्षीला दिलेल्या या पॉईंट्सविरोधात अपील केलं पण ते फेटाळलं गेलं आणि साक्षीने इतिहास घडवला. ऑलिंपिकसारख्या स्पर्धेत 0-5 ची पिछाडी भरून काढत 8-5 ने विजय मिळवणं फार कठीण असतं. त्यामुळे आजचा साक्षीचा विजय म्हणूनच महत्त्वाचा आहे.

ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळविणारी साक्षी ही पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. कुस्तीतले भारताचे हे आजपर्यंतचे पाचवं पदक आहे.

साक्षीने  ब्राँझ मेडल जिंकताच रोहतकमध्ये तिच्या राहत्या घरी एकच जल्लोष करण्यात आला. तिच्या आईवडीलांनी आसपासच्या लोकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close