‘मुलाच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या घाडगे यांच्या रजेचा अर्ज कुठेये?’

August 18, 2016 7:06 PM0 commentsViews:

Mantralay121

18 ऑगस्ट : कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय्य यांच्या आडमुठेपणामुळे एका अधिकार्‍याला आपल्या मुलाचा जीव गमवावा लागला आहे. पण त्या पेक्षा कळस म्हणजे मुलाच्या अंत्यसंस्काराला घाडगे गावी गेले असता याच सहायने त्यांना चक्क रजेचा अर्ज कुठे आहे, अशा माणुसकी शुन्य शेरा घाडगेंच्या विनंती अर्जावर मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुजोर सहायच्या या कृत्याविरोधात मंत्रालयीन कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. कर्मचार्‍यांनी सकाळी कामबंद आंदोलनही केलं आहे.

‘मुलगा आत्महत्या करण्याची धमकी देतोय. मला थोडे लवकर घरी जाऊ द्या’, ही काकुळतीची विनंती कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय्य यांनी धुडकावल्याने या विभागातील सह सचिव राजेंद्र घाडगे यांना पोटचा मुलगा गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत, तयाची चौकशी करावी, असे आदेश राज्य सरकारने मुख्य सचिवांना दिले आहेत.

कोपरखैरणे इथे राहणारे कृषी विभागाचे सह सचिव राजेंद्र घाडगे यांच्या मुलास मानसिक तणावात होता. त्याने वडिलांना फोन करून ‘लवकर घरी या, अशी विनंती केली. ‘लगेच घरी आला नाहीत, तर आत्महत्या करेन, अशी धमकीही त्याने दिली. त्यानंतर घाडगे यांनी लगेचच वरिष्ठ अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय्य यांच्या कानावर ही बाब घातली आणि थोडे लवकर घरी सोडण्याची विनंती केली.

मात्र सहाय्य यांनी ही परवानगी नाकारत साडेपाचपूर्वी जाण्याची परवांगी नाकारली. कार्यालयाची वेळ संपल्यानंतर घाडगे घरी जात असतानाच ‘मुलाने आत्महत्या केली’, असं सांगणारा फोन त्यांना आला आणि त्यांच्या पायांखालची जमीन सरकली.

या घटनेची माहिती मिळताच कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. ‘राजेंद्र घाडगे यांच्याशी आपले बोलणं झालं असून झाला प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे, असे ते म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही सविस्तर चर्चा झाली असून या गंभीर घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असं त्यांनी IBN लोकमतशी बोलताना म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close