भुजबळांना आणखी एक धक्का, नाशिकमधलं ‘फार्म हाऊस’ ईडीच्या ताब्यात

August 22, 2016 4:36 PM0 commentsViews:

 

22 ऑगस्ट : गेल्या अनेक महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांना ईडीनं आणखी एक दणका दिला आहे. नाशिकमधल्या आलिशान भुजबळ फार्मचा ईडीनं ताबा घेतला आहे. यासंबंधीची कागदपत्रं अजून भुजबळ कुटुंबीयांना मिळालेली नाहीत. पण ईडीच्या या कारवाईमुळे आता भुजबळ कुटुंबीयांना नाशिकमध्ये राहायला जागाच नाही अशी वेळी आली आहे.

bhujbal
छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची मोजणी करण्यासाठी ईडीची 5 पथकं आज सकाळीच नाशिकमध्ये दाखल झाली. त्यांच्यासोबत एबीसीचं एक पथकही आलं. आलिशान भुजबळ फार्मचा ईडीनं प्रत्यक्ष ताबा घेतला. या फार्मसह ईडीनं आतापर्यंत भुजबळांच्या 22 मालमत्तांवर टाच आणली आहे. आता या ठिकाणी कोणालाही राहता येणार नाही. त्यामुळे भुजबळ कुटुंबीयांना नाशिकमध्ये राहायला जागा राहिलेली नाही. मात्र, भुजबळ कुटुंबीयांना या आदेशाची कागदपत्रं अजून मिळालेली नाहीत. त्यामुळे मालमत्तेचा ताबा त्यांच्याकडेच असल्याचं त्यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.

नाशिकमधलं आलिशान भुजबळ फार्म हे अनेकांच्या कुतुहलाचा विषय ठरलं होतं. या फार्मच्या आवारात 3 मोठमोठे बंगले आहेत. हे फार्म हाऊसची बहुतांश जागा ही वडिलोपार्जित असून उर्वरित जागा त्यांनी विकत घेतली आहे. त्यामुळे हा आलिशान बंगला भुजबळांनी बेहिशेबी पैशातून घेतला असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या जागेची किंमत 433 कोटी रूपयांवर पोहोचली आहे.

भुजबळांचा राजमहाल
– बंगल्याचं क्षेत्रफळ 46,500 चौ.फू.
– भुजबळांच्या बंगल्यात 25 आलिशान खोल्या
– जुन्या राजमहालाच्या प्रतिकृतीप्रमाणे बांधकाम
– बंगल्याची किंमत अंदाजे 100 कोटी
– स्विमिंगपूलसह अत्याधुनिक सोयी-सुविधा
– बंगल्यातील फर्निचर परदेशी बनावटीचं
– बंगल्यात सामान्य कार्यकर्त्याला प्रवेश नाही

आता मात्र, सगळं चित्रच बदललं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close