दाऊद इब्राहिम पाकिस्तानच, 9 पैकी 6 पत्त्यावर ‘युनो’चं शिक्कामोर्तब

August 23, 2016 4:42 PM0 commentsViews:

Dawood Ibrahim123

23 ऑगस्ट :   पाकिस्तानातील दाऊद इब्राहिम राहत असलेल्या ठिकाणांचे भारताने दिलेले 9 पैकी 6 पत्ते बरोबर असल्याचा दुजोरा संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) दिला आहे. संयुक्त राष्ट्रांनी दाऊदच्या पत्त्यांवर शिक्कामोर्तब केल्यानं भारताचा गेल्या अनेक वर्षांचा दावा खरा ठरला आहे. दरम्यान, पाकिस्तानने मात्र नेहमीप्रमाणे दाऊदचा ठावठिकाणा माहीतच नसल्याचा कांगावा केला आहे.

भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्बंध समितीकडे दाऊदचे 9 पत्ते सादर केले होते, आणि दाऊदला आश्रय दिल्याबद्दल पाकिस्तानविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यावर ‘युनो’ने त्या पत्त्यांना दुजोरा दिला. त्यापैकी 3 पत्ते चुकीचे असल्याने ते यादीतून काढून टाकण्यात आले आहेत.

सुरक्षा परिषद समितीने 1999, 2011 आणि 2015 मधील ठरावांनुसार 22 ऑगस्ट 2016 रोजी त्या कागदपत्रांमध्ये अधोरेखित करून आणि खोडून सुधारणा केल्या. इसिस आणि अल-कायदासंबंधित निर्बंध यादीतील संपत्ती जप्ती, प्रवास बंदी, शस्त्रबंदी घालावयाच्या व्यक्ती आणि संस्थांच्या यादीत दाऊदचं नाव घेतलं.

भारताने दिलेल्या 9 पत्त्यांपैकी 6 पत्ते खोडण्यात आले. त्यापैकी एक पत्ता पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी प्रतिनिधी मलीहा लोधी यांच्या पत्त्याशी मिळताजुळता होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा