पुण्यातल्या पालकमंत्र्यांच्या निर्णयामुळे ‘कष्टाची भाकर’ही हिरावणार?

August 23, 2016 6:06 PM0 commentsViews:

अद्वैत मेहता, पुणे

23 ऑगस्ट :   हमाल, कचरावेचक, बस कंडक्टर, ड्रायव्हर्स अशा गरीब कष्टकर्‍यांचं अवघ्या 25 रुपयात पोटभर जेवण देणारी पुण्यातील कष्टाची भाकर सरकारच्या तुघलकी निर्णयामुळे करपण्याची भीती आहे. सवलतीत दिला जाणारा साखर आणि केरोसिनचा पुरवठा महाग झाल्यानं गरिबांचा तोंडचा घासही हिरावला जाणार का, असा संतप्त सवाल या उपक्रमाचे जनक बाबा आढाव यांनी केला आहे.

Kshatachi bhajkar123
पुण्यातील भवानी पेठेत 1974 साली गरीब कष्टकरी कामगार वर्गाला स्वस्तात पोटभर जेवण मिळावं म्हणून ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर कष्टाची भाकर हा उपक्रम सुरू झाला. पुण्यात 11 ठिकाणी सुरू असलेल्या या उपक्रमाचा लाभ रोज लाखभर लोक घेतात. या केंद्रांवर पिठलं भाकरी, चपाती, भाजी, लाडू असे रुचकर आणि सकस पदार्थ अत्यंत स्वस्तात दिले जातात. परंतु 15 क्विंटल साखर आणि 8 हजार किलो लिटर रॉकेलचा कोटा सरकारने सवलत बंद केल्याने आता कष्टाची भाकर महाग झाली आहे.

या तुघलकी निर्णयाचा फटका हमाल, कचरा वेचक, हातावर पोट असणारे अशा कष्टकरी कामगारांना तर बसणार आहेच, पण त्यासोबतच त्यांच्यासाठी स्वयंपाक तयार करणार्‍या कष्टकरी महिलांना बसणार आहे. दारिद्रय रेषेखाली असणार्‍या शिधापत्रिका धारक लोकांनाच आता सवलतीच्या दरात रॉकेल आणि साखर द्यायचा निर्णय पुण्याचे पालक मंत्री असलेल्या गिरीश बापट यांच्या खात्याने घेतला आहे.

एकीकडे तुरडाळ, उडीद डाळ महाग, भाजीपाला दर चढे अशात महागायीचे चटके सहन करणारा कष्टकरी वर्ग हॉटेलात जायचा विचार करू शकत नाही. सरकार स्वत:गरीब लोकांचं पोट भरू शकत नसेल तर नका देऊ पण किमान कष्टाची भाकरसारख्या लोकोपयोगी उपक्रमांना तरी सरकारने नख लावू नये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा