लाखोंची वर्गणी उकळून दहीहंडीच्या नावाखाली होतय राजकीय शक्तीप्रदर्शन?

August 24, 2016 9:58 PM0 commentsViews:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड
24 ऑगस्ट :  सळसळती तरुणांई, प्रचंड उत्साह आणि जल्लोष, अशी काहीशी मागील काही वर्षांपर्यंत दहिहंडी उत्सवाची व्याख्या करता आली असती, मात्र अलीकडच्या काळात ह्या उत्सवाच्या नावावर उधळल्या जाणार्‍या करोडो रुपयांमुळे या उत्सवाचं रुपडंच काहिसं बीभत्स होत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

hjsadhlay

एकट्या पिंपरीतल्या एका दहीहंडी मंडळाच्या उत्सवाला एवढ्या सार्‍या हिरोईन्स येणार आहेत. ही यादी अजूनही लांबलचक आहे. बरं एकट्या पिंपरीतच 70 पेक्षा अधिक सेलिब्रिटी दंहीहंडीसाठी हजेरी लावणार आहेत. अर्थात यांच्यापैकी नेमक्या किती जणांना दहिहंडीचा नेमका अर्थ माहित असेल माहित नाही. पण गर्दी खेचण्यासाठी आजकाल दहीहंडीच्या नावाखाली सर्रासपणे हे असेच मेगा इव्हेंट भरवले जात आहेत. त्यासाठी लाखोंची वर्गणी उकळली जाते अर्थात हे सगळं राजकीय शक्तीप्रदर्शनासाठी केलं जातं हे इथं वेगळं सांगायला नको.

दहीहंडी आयोजकांना मात्र, हे आरोप मान्य नाहीत उजळ माथ्याने या उत्सवाला ते पंरपरेचं नाव देऊन मोकळे होतात बरं ते जाऊ द्या दहीहंडी उत्सवासाठी नट्या कशासाठी बोलावतात असं विचारलं तर त्याचं उत्तरही स्वयंघोषित नेतृत्वाने मोठं गंमतीशीर दिलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवर मर्यादा आणली असली तरी या सांस्कृतिक महोत्सवाच्या आडून चालणार्‍या इव्हेंटबाजीला आणि राजकीय शक्तीप्रदर्शनाला नेमकं कोण आणि कसं आवर घालणार हा प्रश्नच आहे. म्हणूनच सुप्रीम कोर्टाने दहीहंडीच्या उंचीवर मर्यादा घालण्यासोबतच या उत्सवाच्या नावाखाली चालणार्‍या नंग्यानाचावरही भाष्य केलं असतं सामान्यांना नक्कीच बरं वाटलं असतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा