मुंबईत 29 ऑगस्टपासून रिक्षा- टॅक्सीचा बेमुदत संप

August 24, 2016 10:25 PM0 commentsViews:

24 ऑगस्ट : ओला आणि उबेर या खासगी टॅक्सी सेवा देणार्‍या वाहतूकीवर कारवाई करावी, या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालक बेमुदत संपावर जाणार आहेत. जयभगवान रिक्षा आणि टॅक्सी महासंघाकडून बुधवारी बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरांना प्रवासासाठी पुन्हा एकदा कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

taxi-autos
खासगी टॅक्सी सेवा देणार्‍या ओला-उबरवर कारवाई न झाल्यास 29 ऑगस्टपासून रिक्षा आणि टॅक्सीचा बेमुदत संप पुकारण्यात यईल, असं जय भगवान टॅक्सी-रिक्षा महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी जाहीर केलं आहे.

जवळचं भाडं नाकारणं, अरेरावी, उर्मटपणा रिक्षा-टॅक्सीचालकांच्या वर्तनाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना ओला आणि उबरकडून अल्प दरात चांगली सेवा मिळते. मात्र यामुळे टॅक्सी-रिक्षाचालकांचा व्यवसाय घटत असून ओला-उबरवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

ओला आणि उबेर टॅक्सी सेवा देणार्‍या वाहतूकीवर कारवाई करण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले होते. मात्र अजूनही त्यांच्यावर कारवाई न झाल्याने आता पुन्हा संपाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय जय भगवान महासंघाने घेतला आहे. या बेमुदत संपामध्ये 70 ते 80 हजार रिक्षा आणि टॅक्सी चालक रस्त्यावर उतरणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा