मुंबईत गोविंदा पथकांकडून लागले निषेधाचे थर!

August 25, 2016 2:05 PM0 commentsViews:

25 आॅगस्ट : दहीहंडीची उंची आणि गोविंदाचं वय याबाबत सुप्रीम कोर्टाने घातलेल्या निर्बंधांचे पडसाद मुंबई-ठाण्यातील दहीहंडी उत्सवादरम्यान उमटताना दिसत आहेत. दहीहंडीच्या उंचीवर 20 फुटांची मर्यादा घालण्याचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे गोविंदांच्या आनंदावर विरजण पडले होते. मात्र, गोविंदा पथकांनी आज उत्साहात रस्त्यावर उतरत अनोख्या पद्धतींनी न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला.

मुंबईतील दादर भागात गोविंदानी रस्त्यावर झोपून नऊ थर लावून आपला निषेध नोंदवला तर काही मंडळांनी शिडीचा आधार घेऊन हंडी फोडली. त्यानंतर याठिकाणी अनेक गोविंदा पथकांनी चार थर लावून हंडीला सलामी दिली. मात्र, यावेळी चौथ्या थरावरील गोविंदांनी काळे झेंडे फडकावून आपला निषेध नोंदवला.

Nished handhi123

गोविंदाचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असू नये तसंच दहीहंडीची उंची 20 फुटांपर्यंत ठेवावी, असे निर्बंध सुप्रीम कोर्टाने दहीहंडी उत्सवावर घातले आहेत. या आदेशावर सर्वच दहीहंडी उत्सव मंडळं आणि गोविंदा पथकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. कोर्टाने घातलेली वयोमर्यादेची अट बहुतांश मंडळं पाळताना दिसत आहेत. मात्र उंचीची अट कोणतंही मंडळ काटेकोरपणे पाळताना दिसत नाही.

ठाण्यातील नौपाडा भागात मनसेच्यावतीने बांधण्यात आलेल्या दहीहंडीत उघडपणे कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. तिथे 40 फुटांपेक्षा जास्त उंचीचा मानवी मनोरा रचण्यात आला. तेथील हंडीही 40 फुटांच्यावर बांधण्यात आली असून 11 लाखांचं बक्षिसही ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर कोर्टाच्या आदेशाला उघड आव्हान दिलंय. कोर्टाचा हा आदेश म्हणजे सण बंद करण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप करत पूर्वीप्रमाणेच दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केलं होतं. या सर्व घडामोडींचे पडसाद दहीहंडीदरम्यान पाहायला मिळत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा