कोर्टाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या ‘जय जवान पथका’वर गुन्हा दाखल

August 25, 2016 4:31 PM0 commentsViews:

25 ऑगस्ट :  ठाण्यात नऊ थर लावून सलामी देणाऱ्या जोगेश्वरीच्या जय जवान मंडळ आणि मनसेचे दहीहंडी आयोजक अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावरवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाचे नियम धाब्यावर बसवत ठाण्यातील नौपाड्यात जय जवान मंडळानं नऊ थर रचले. तसंच बाल गोविंदालाही वर चढवण्यात आलं होतं. सुरुवातीला पोलिसांनी हस्तक्षेप केला. पण पोलिसांच्या विरोधाला न जुमानता 9 थर लावण्यात आले. 9 थर लावल्यानंतर मैदानात एकच जल्लोष झाला. मात्र काहीवेळातच नौपाडा पोलिसांनी थर लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच, अविनाश जाधव यांना यासंदर्भात तात्काळ नोटीसही धाडण्यात आली आहे.

याप्रकरणी बोलताना जाधव म्हणाले, मी माझ्यासाठीच हे केलं आहे. मी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला नाही. पोलिसांना जे करायचे आहे ते करूद्यात. माझ्या पाठिशी राज साहेब आहेत. मला कोणाचीही भीती वाटत नाही. तसंच  साहेबांवर 92 गुन्हे दाखल असताना माझ्यावर एक गुन्हा दाखल झाल्याने काय फरक पडणार’, असंही ते म्हणाले.

दरम्यान, जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, हे दुर्देवाची गोष्ट आहे. मी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाई न करण्याची मागणी करणार असल्याचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा