गोविंदा आला रे… पण, 19 मंडळांवर गुन्हे दाखल!

August 25, 2016 9:19 PM0 commentsViews:

25 ऑगस्ट : सुप्रीम कोर्टाचे निर्बंध धाब्यावर बसवून मुंबईतील काही गोविंदानी थरांचा थरार लावण्याची परंपरा कायम ठेवली तर काही भागात अनोख्या पद्धतीने न्यायालयाचा निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली. गोविंदा रे गोपाळा म्हणत 20 फुटांपेक्षा अधिक उंचीवर थर लावत गोविंदा पथकांनी सुप्रीम कोर्टाच्या मर्यादांचं उघड-उघड उल्लंघन केल्याचं गुरुवारी दिसून आले. मात्र थरांचा थरथराट उभारणाऱ्या या गोविंदा पथकांना आता पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.  ठाण्यातील 16 गोविंदा पथकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे हंडीचा थरारक खेळ करताना आतापर्यंत 71 हून अधिक गोविंदा जखमी झाले आहेत.

Dahi handi213

दहीहंडीच्या उंचीवर 20 फुटांची मर्यादा घालण्याचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे गोविंदांच्या आनंदावर विरजण पडले होते. मात्र, गोविंदा पथकांनी आज उत्साहात रस्त्यावर उतरत अनोख्या पद्धतींनी कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. गोविंदा मंडळांकडून कोर्टाने घालून दिलेल्या उंचीच्या मर्यादेचं पालन करत सर्वात वरच्या थरावरील गोविंदाकडून काळे झेंडे दाखवून सलामी देत आपली नाराजी व्यक्त केली. तर मुंबईतील दादर भागात गोविंदानी रस्त्यावर झोपून नऊ थर लावून आपला निषेध नोंदवला तर काही मंडळांनी शिडीचा आधार घेऊन हंडी फोडली.

सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करणाऱ्या ‘जय जवान’ मंडळाने कोर्टाचे आदेश झुगारत ठाण्यात 9 थर लावले. त्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नियम मोडणाऱ्या मंडळांविरुद्ध कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असं ठाणे पोलिसांनी सांगितलं.

71 हून अधिक गोविंदा जखमी

सुप्रीम कोर्टाने यंदा 20 फुटांपेक्षा जास्त उंचीचे थर लावण्यास नकार दिल्यानंतर यंदा जखमी गोविंदाच्या संख्येतही लक्षणीय घट झाली असली तरी मुंबईत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 71 गोविंदा जखमी झाले होते. त्यापैकी 54 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आलं. तर 17 जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सायन रुग्णालयात 5, नायर रुग्णालयात 4, नानावटी रुग्णालयात 1, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअरमध्ये 6 आणि भाभा रुग्णालयात 3 गोविंदावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतं.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा