हाजी अली दर्ग्यात महिलांनाही प्रवेश, मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

August 26, 2016 1:50 PM0 commentsViews:

haji ali darga1

26 ऑगस्ट :   जिथं पुरुषांना जाण्याची परवानगी आहे, तिथे महिलांनाही जाण्याचा अधिकार आहे, असं म्हणत मुंबई हायकोर्टाने हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशाची बंदी उठवली.  मुंबई हायकोर्टानं आज (शुक्रवारी) महिलांवरील प्रवेशबंदी उठवण्याचा हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे मुंबईतील प्रसिद्ध हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या महिलांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. पण असं असलं तरी हाजीअली ट्रस्टनं या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं महिलांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट बघावी लागणार आहे.

महिलांना मुंबईतील वरळी इथल्या प्रसिद्ध हाजीअली दर्ग्यातील पवित्र मजारपर्यंत जाण्यास बंदी घातल्याचा विरोधात डॉ. नूरजहाँ सोफिया नियाज  झाकिया सोमान आणि काही संघटनांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सकाळी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टानं याचिकाकर्त्यांच्या बाजूनं आपला निकाल सुनावला आहे.

दरम्यान, हाजीअली ट्रस्ट या हायकोर्टानं दिलेल्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई हायकोर्टानं ट्रस्टला सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. महिलांच्या प्रवेशासाठी अनेक आंदोलनं झाल्यानंतरही हाजीअली ट्रस्ट आपल्या भूमिकेवर ठाम होतं, तर सरकारनं ट्रस्टच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा