दहीहंडीत कायदा मोडणाऱ्या गोविंदांचा राज ठाकरे करणार सत्कार

August 27, 2016 5:05 PM0 commentsViews:

Raj_at_MNS_Koli_Festival

26 ऑगस्ट :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. दहीहंडीच्या दिवशी गुन्हे दाखल झालेल्या गोविंदा पथकांची भेट राज ठाकरे घेणार आहेत. ठाण्यात 16 गोविंदा पथकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाने दहीहंडीबाबत आखून दिलेले नियम मनसेकडून पायदळी तुडवण्यात आले. चेंबुर, ठाण्यामध्ये मनसेने थरांचं बंधन धुडकावून लावत उंच दहीहंडी रचली. ठाण्यातील नौपाड्यात तर मनसेने कायदेभंग दहीहंडीचं आयोजन केलं होतं. नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखांचं बक्षीस मनसेतर्फे जाहीर करण्यात आलं होतं. जय जवान मंडळाने 9 थरांची सलामी दिली. यावेळी पोलिसांनी कुणालाही रोखलं नाही. मात्र, कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला.

कोर्टाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या जय जवान पथक आणि ठाण्यातील नौपाडामधील मनसेचे हंडी आयोजक अविनाश जाधव यांच्यासह 16 गोविंदा पथकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यकर्त्यांना शाबासकी देण्यासाठी रविवारी संध्याकाळी सहा वाजता राज ठाकरे ठाण्यात जाणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा याप्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा