जीएसटी विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर

August 29, 2016 5:30 PM0 commentsViews:

vidhan

29 ऑगस्ट :   बहुचर्चीत आणि अनेक दिवसांपासून रखडलेल्या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी जीएसटी विधेयकाला राज्याच्या विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. विधानसभेत एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून आता राज्यभरात जीएसटी करप्रणाली लागू करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जीएसटी विधेयकाला संसेदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत बहुमताने मंजुरी देण्यात आली. पण हा कायदा लागू होण्यासाठी 16 राज्यांच्या मंजुरीची गरज आहे. त्यापैकी 8 राज्यांनी आधीच मंजुरी दिली. महाराष्ट्रानेही आज जीएसटीवर मान्यतेची मोहोर उमटवली. जीएसटी 1 एप्रिल 2017 पासून लागू करण्याचा केंद सरकारचा प्रयत्न आहे.

सोमवारी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत जीएसटी विधेयक सादर केलं. विधेयकावरच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी सरकारवर टीका केली. काँग्रेसच्या जुन्या योजना भाजप सरकारने नव्याने आणू पाहत आहे असून जीएसटीचं श्रेय भाजप सरकराने लाटू नये असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जीएसटीमुळं राज्यातले 17 कर कमी होणार असून या विधेयकामुळे राज्याचं एक रुपयाचंही नुकसान होणार नाही असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा