मांसबंदीच्या मुद्द्यावरून महापालिका आणि राज्य सरकारमधला विसंवाद उघड

August 29, 2016 8:47 PM0 commentsViews:

29 ऑगस्ट :  पर्युषण पर्वकाळात मुंबईमध्ये मांसविक्रीवर बंदी नसल्याचं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे. याबद्दल परिपत्रक महापालिकेने काढलं आहे. पर्युषणकाळात फक्त देवनार कत्तलखाना बंद राहणार असल्याचंही महापालिकेने स्पष्ट केलं आहे. महापालिकेने राज्य सरकारपेक्षा वेगळी भूमिका घेतल्यामुळे हे मतभेद उघड झाले.

दरम्यान, त्यापूर्वी राज ठाकरेंनी पर्युषण काळातल्या मांसविक्री बंदीला जाहीर विरोध केला. प्रर्युषण काळातही मांसविक्री सुरुच ठेवा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं, मांसाहार करायचा की नाही याचा निर्णय सरकारनं घेऊ नये, लोकांच्या आहारात सरकारनं लुडबूड करु नये, असंही राज यांनी ठणकावलं. राज यांच्या टीकेनंतर आज सकाळी मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मांसविक्रीबंदी विरोधात आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी देशपांडे यांच्यासह काही मनसे कार्यकर्त्यांना थोडा वेळ ताब्यात घेतलं.

MNS protest21
मुंबई महापालिका आणि राज्य सरकारमधला विसंवाद समोर आला. पर्युषण काळामध्ये 2 दिवस देवनारचा कत्तलखाना आणि मांसविक्री पूर्णपणे बंद राहील असं राज्य सरकारनं सांगितलं होतं. खरं तर अनेक वर्षांपासून पर्युषण काळात मुंबईतले कत्तलखाने एक दिवस बंद असतात. गेल्यावर्षी कत्तलखाने बंद होते, मात्र मांसविक्री सुरू होती. त्यानंतर मुंबई महापालिकेत एक प्रस्ताव सादर करण्यात आला. यानुसार कत्तलखान्यावर बंदी होती, पण मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली नव्हती. यंदा ही बंदी दोन दिवस होती. त्यातल्या एक दिवस गणेशचतुर्थीचं कारण देण्यात आलं. पण राज्य सरकारनं खेळी केल्याचा आरोप करत मनसेनं आक्रमक भूमिका घेतली.

हे जैनिस्थान नाही, हिंदुस्थान आहे, असं म्हणत अबू आझमी यांनी या मांसविक्री बंदीचा विरोध केला आहे. तर कोणाचे उद्योग बंद राहू शकत नाहीत, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

आधी दहीहंडीच्या थरांच्या मर्यादेला विरोध आणि आता पर्युषणामध्ये मांसविक्री बंदीला विरोध. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक भूमिका घेऊन मनसे वातावरण तापवण्याचा मात्र प्रयत्न करतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा