दलित शब्द घटनाबाह्य, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचं निरीक्षण

August 29, 2016 10:51 PM0 commentsViews:

प्रवीण मुधोळकर, नागपूर

29 ऑगस्ट :  ‘दलित’ हा शब्द घटनाबाह्य असल्याचं निरीक्षण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नोंदवलं आहे. ‘दलित’ या शब्दाच्या वापराला आक्षेप घेणारी जनहित याचिका नागपूरच्या पंकज मेश्रराम यांनी दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती भूषण गवई आणि विनय देशपांडे यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. या प्रकरणात केंद्र आणि राज्य सरकारनं तीन आठवड्यात उत्तर द्यावं असे निर्देशही कोर्टानं दिले आहे. ‘दलित’ या शब्दानं विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे हा शब्द वापरला जाऊ नये असं याचिकाकर्त्याचं म्हणण होतं. दरम्यान, दलित साहित्यांकांनी कोर्टाचा हा निर्णय आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं आहे.

dalit

‘दलित’ हा शब्द खरंतर आपल्याकडे साहित्य, चळवळ आणि भाषणांमध्ये सर्रास वापरला जातो. अनेक दलित संघटनांच्या नोंदणीकृत नावामध्ये देखील हाच शब्द आहे. पण आता याच शब्दाला आक्षेप घेतला गेला आहे. नागपूर हायकोर्टाने देखील हा घटनाबाह्य असल्याचं सांगत वापरायला बंदी केली आहे. ‘दलित’ हा शब्द वापरल्याने एका विशिष्ठ समाजाच्या भावना दुखावल्या जातात. म्हणूनच आम्ही याविरोधात कोर्टात गेलो होतो असे याचिकाकर्त्याच्या वकीलाने म्हटलं आहे.

दलित साहित्यिकांनी मात्र, या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. ‘दलित’ या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये, असा सूरही अभ्यासकांनी लावला आहे.

मार्गासवर्गीय जातींसाठी महात्मा गांधींनी हरीजन शब्द वापरला होता पण, त्यालाही अनेकांनी आक्षेप घेतल्यानं, नंतर मग तो मागे पडला आहे. मागासवर्गीय समाजामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जागृती निर्माण केल्यानंतर ज्या काही चळवळी उभा राहिल्या किंवा जे काही साहित्य लिहिलं गेलं ते देखील दलित साहित्य चळवळीच्याच नावाने ओळखलं जाऊ लागलं थोडक्यात ‘दलित’ हा शब्द जातीवाचक न राहता परिस्थिती निदर्शक बनला. म्हणूनच दलित संघटनांनाही त्यावर काहीच आक्षेप नाही पण, आता कोर्टानेच या शब्दाला घटनाबाह्य ठरवल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. बरं समजा ‘दलित’ शब्द वापरायचा नाही म्हटलं तर मग त्याऐवजी पर्यायी शब्द काय हा प्रश्नच आहे. म्हणूनच आता सरकार यावर नेमकी कोणती भूमिका मांडत आहे हेही पाहावं लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा