‘अॅट्रॉसिटी’ला नाही तर कायद्याच्या गैरवापराला विरोध- शरद पवार

August 30, 2016 3:15 PM0 commentsViews:

30 ऑगस्ट :  अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला जाऊ नये, इतकीच आमची भूमिका आहे. तो कायदा रद्द करावा असं आमचं म्हणणं नाही,’ अशी नवी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मांडली.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विशेष म्हणजे पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या मुद्यांना हात घातला पण त्यांचं लक्ष्य होतं ते दलित-मुस्लिम-मराठा कार्ड. कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेनंतर अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. तर, रविवारी जालनामध्ये बोलताना पवार यांनीही गैरवापर होत असेल तर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा असं म्हटलं होतं. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी अॅट्रॉसिटी प्रकरणी आज सारवासारव केली.

Sharad Pawar on tobacco

अॅट्रॉसिटी’चा गैरवापर दलितांकडून नाही तर स्थानिक राजकारण्यांकडून केला जातोय. स्थानिक राजकारणामुळे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होतात, त्यामुळे अशांवर सरकारचा वचक असला पाहिजे, असं मतही पवारांनी व्यक्त केलं आहे.

निर्दोष मुस्लिम तरुणांवरील कारवाईबद्दलही पवार यांनी चिंता व्यक्त केली. ‘मुस्लिम संघटनांनी इसिसचा निषेध केला आहे. तरीही, मराठवाड्यासह काही ठिकाणी तरुणांची धरपकड करण्यात येतं. मुस्लिम तरुणांची अशी सरसकट धरपकड करणं चुकीचं आहे. मुस्लिम तरुणांना अटक केली जात असेल तर 24 तासांत न्यायालयासमोर हजर करायला हवं,’ असं पवार यांनी सांगितलं.

ओबीसी आणि एसटी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठय़ांना आरक्षणात सामावून घेतलं पाहिजे. पण हे आरक्षण आर्थिक निकषांवरच दिलं पाहिजं. जेणेकरून समाजातील प्रत्येक घटकाला याचा लाभ घेता येईल, असंही पवार यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा