बाईकस्वारांच्या मारहाणीत जखमी झालेले कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचं निधन

August 31, 2016 4:55 PM1 commentViews:

Constable vilas shinde

31 ऑगस्ट :  ड्युटीवर असताना बाईकस्वारांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचं आज (बुधवारी) दुपारी लिलावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं आहे.

गेल्या मंगळवारी वांद्रे इथं कर्तव्य बजावत असताना विलास शिंदे यांनी एका अल्पवयीन विनाहेल्मेट गाडी चालवताना पकडलं. त्याच्याकडे लाईसन्सदेखील नव्हतं. याबाबत चौकशी सुरू असतानाच अल्पवयीन मुलानं आपल्या भावाला बोलावून घेतलं. त्याच्या मोठ्या भावाने मागून येऊन थेट पोलिसाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केला. या हल्ल्यात विलास शिंदे जबर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच (मंगळवारी) कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना विलास शंदे यांना झालेल्या माराहणीचा उल्लेख केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. त्यानंतर राज यांनी रुग्णालयात जाऊन विलास शिंदे यांच्या कुटुंबाचीही भेट घेतली होती. शिंदे कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं होतं. मात्र आज विलास शिंदेंची लीलावती रुग्णालयात प्राणज्योत मालवली.

विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत देण्याची घोषणा गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचेही आश्वासन सरकारने दिले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Aakashhiwale

    अखेर ‘त्या’ कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसाची मृत्यूशी झुंज संपली; कोण करणार पोलिसांचे रक्षण?
    वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    विलास शिंदे यांना मी माझ्या तर्फे श्रद्धांजली अर्पण करतो !