आता करा ‘डेटा’गिरी!, रिलायन्सच्या क्रांतिकारी 4Gची घोषणा

September 1, 2016 1:17 PM0 commentsViews:

new jioy

01 सप्टेंबर:  रिलायन्सची बहुप्रतिक्षित जिओ 4 जी सेवा आज (गुरूवारी) लाँच झाली आहे. रिलायन्स उद्योग समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे, जिओच्या  देशभरातील ग्राहकांना 3 महिन्यांसाठी फ्री रोमिंग, फ्री व्हॉईस कॉलिंग, फ्री एसएमएस आणि त्यानंतर एक जीबी डेटासाठी फक्त 50 रुपये भरावे लागतील अशा आकर्षक सवलतींची मुकेश अंबानींनी अक्षरशः बरसातच केली आहे. जिओमुळे भारताला स्वस्त दरात उत्तम दर्जाची इंटरनेट डेटा सुविधा मिळणार आहे. जेवढा डेटा तुम्ही जास्त वापराल तेवढे कमी पैसे तुम्हाला मोजावे लागतील, असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

भारतीयांना गांधीगिरी आवडतं. आता रिलायन्स जिओच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय चांगल्या गोष्टींसाठी डेटागिरी करु शकेल, असं मुकेश अंबानींनी म्हटलं आहे. याशिवाय 2017 पर्यंत रिलायन्स जिओ 90 टक्के भारतीयापर्यंत पोहोचेल, असा दावाही त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रिलायन्स जिओ महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ऑक्सिजनशिवाय जगता येणार नाही, डेटा हा डिजिटल युगाचा ऑक्सिजन आहे. ती गरज जिओ पूर्ण करेल, असंही ते म्हणाले. डिजिटल क्रांतीने शिक्षण, आरोग्य, कृषी, बँकिंग अशी सारी क्षेत्रे बदलणारी आहेत. ती अधिक जनताभिमुख, पारदर्शी, सर्वव्यापी आणि जलद होतील, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा