‘ते’ विधान मागे नाहीच !, राहुल गांधींना राहावं लागणार भिवंडी कोर्टात हजर

September 1, 2016 7:50 PM0 commentsViews:

rahul gandhiaw01 सप्टेंबर : महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता, हे विधान मागे घेण्यास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे त्यांना आता भिवंडी इथल्या कोर्टामध्ये हजर राहून सुनावणीला सामोरं जावं लागणार आहे.

2014च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान भिवंडी इथं सभेमध्ये भाषण करताना राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक असल्याची टीका केली होती. त्यानंतर भिवंडीमधले संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.

मात्र, हा दावा फेटाळण्यात यावा आणि त्यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्यात सवलत मिळावी यासाठी राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. तो त्यांनी आज मागे घेतला.

महात्मा गांधींच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संपूर्ण संघटनेला जबाबदार ठरवलं नव्हतं, तर संघाचे काहीजण गांधींजींच्या हत्येमागं होते असं मी म्हटलं होतं आणि आजही मी त्यावर ठाम आहे असं राहुल यांनी आज सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं. त्यामुळे आता यापुढचा खटला भिवंडीच्या कोर्टात सुरू राहील आणि कोर्टाने सवलत दिली नाही तर राहुल यांना त्याच्या सुनावणीसाठी उपस्थित राहावं लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा