केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात देशव्यापी संप

September 2, 2016 8:49 AM0 commentsViews:

IndiaTv92af9d_bank_strike

02 सप्टेंबर : केंद्र सरकारची कामगारविषयक धोरणं कामगारांच्या हिताची नसल्याचा आरोप करत 11 कामगार संघटनांनी आज, शुक्रवारी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे बँकिंग, दूरसंचार आणि वाहतूक या प्रमुख सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. कामगारांच्या हिताकडे सरकार लक्ष देत नसल्याचे संपकरी संघटनांचे म्हणणे आहे.

11 केंद्रीय कामगार संघटना, केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे महासंघ, बँक, विमा, संरक्षण आदी क्षेत्रांतील कामगारांचे अखिल भारतीय महासंघ आणि अन्य क्षेत्रांतील काम करणाऱ्या कामगार संघटना या संपात सहभागी होणार आहेत. यामध्ये राज्यातील अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचाही समावेश आहे. मात्र या संपातून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने माघार घेतली आहे. त्यामुळे सरकारी कामकाजावर संपाचा परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे. तरी आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची चिन्हे असल्याने सर्वसामान्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानेही संपात सहभागी होणार नसल्याचं संघटनेचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील बहुसंख्य कर्मचारी संघटना आजच्या देशव्यापी संपात सहभागी होणार असल्याने या बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही बँकांनी ग्राहकांना संदेश पाठवून याची कल्पनाही दिली आहे. मात्र या संपात बेस्ट, एसटी बसेस, रिक्षा आणि टॅक्सी सहभागी होणार नाहीत. त्यामुळे मुंबईच्या सार्वजनिक सेवेवर ताण येणार नाही. कामगारांच्या हिताकडे सरकार लक्ष देत नसल्याचे संपकरी संघटनांचे म्हणणे आहे. सरकारला दिलेल्या 12 मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले असल्याचा दावा केंद्रीय कामगार संघटनांनी केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा