मुंबईतील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, गृहनिर्माण धोरणाची घोषणा

September 2, 2016 11:07 PM0 commentsViews:

मुंबई, 2 सप्टेंबर : मुंबईतील सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून गृहनिर्माण धोरणाची आखणी केली असून, या धोरणाच्या माध्यमातून सामान्य माणसासाठी घेतलेल्या भूमिकेवर सरकार ठाम राहील, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखो मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या नव्या गृहनिर्माण धोरणाची घोषणा केली.cm_fadanvis

मुंबईतील जुन्या चाळी, मोडकळीला आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग या धोरणामुळे मोकळा होणार आहे. मुंबईचा कायापालट घडवू पाहणारे हे अत्यंत महत्वाचे गृहनिर्माण धोरण पंतनगर, घाटकोपर येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. सामान्य माणसाचे घराचे स्वप्न या धोरणामुळे पूर्ण होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्‌्ा्री. फडणवीस म्हणाले की, जुन्या धोरणाने पुनर्विकास अडवून ठेवल्यामुळे मुंबईत घरांचे प्रश्न बिकट झाले. त्यामुळे नवे गृहनिर्माण धोरण आखण्याची लोकप्रतिनिधींची अनेक वर्षांपासून मागणी होती. जुन्या धोरणामुळे गेल्या दहा वर्षांत पुनर्विकासाचे कामच सुरू झाले नाही, मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार सर्वांसाठी घर देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदींसह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा