मनसेचं उत्तरभारतीय फळविक्रेत्याला ‘खळ्ळ खट्याक’

September 8, 2016 12:33 PM0 commentsViews:

मुंबई, 08 सप्टेंबर : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं पुन्हा एकदा मराठी माणसाचा मुद्दा हाती घेतलाय. विक्रोळी भागात एका उत्तर भारतीय फळ विक्रेत्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘खळ्ळ खट्याक’ चा दणका दिलाय.

प्रत्येक निवडणुकीत अपयशी आल्यामुळे येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मनसेचं इंजिन पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी धडपड सुरू केलीये. विक्रोळीत एका उत्तर भारतीय फळ विक्रेत्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिलाय. या उत्तरभारतीय फळविक्रेत्याने  एका शेतकऱ्याला भाजी विकून दिली नाही असा आरोप मनसेनं केला.

mns_vikroli

उत्तर भारतीय फळ विक्रेत्याने आपल्याला भाजी विकू दिली नाही अशी तक्रार त्याने आपल्याकडे केली असं मनसे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आम्ही या फळ विक्रेत्याला चोप दिलाय असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मनसे कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीतर त्यांनी त्याच्या फळांच्या गाडीची तोडफोड केली त्याच्या फळांचंही नुकसान केलंय.

तसंच या कार्यकर्त्यांनी फळ विक्रेत्याला शेतकऱ्याची माफीही मागायला लावली. या लोकांनी फुटपाथवर आक्रमण केलं आणि रस्त्यावरही लोकं भाजी विकू देत नसतील तर त्यांना असाच धडा शिकवू असा इशारा मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close