कुठे नेऊन ठेवला पुरोगामी महाराष्ट्र ?,जागेअभावी पार्थिवासाठी 6 तास पायपीट !

September 9, 2016 10:02 AM0 commentsViews:

बुलडाणा, 09 सप्टेंबर : महाराष्ट्राला आपण पुरोगमी म्हणतो..पण तो किती पुरोगामी आहे हे वारंवार दिसत असतं. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल मध्ये दलितांना तब्बल 70 वर्षांपासून स्मशानभूमी नसल्याने गुरुवारी एका महिलेचे प्रेत रस्त्यावर ठेऊन या लोकांनी  रास्तारोको केला. त्यानंतर गावक-यांनी संग्रामपूर तहसिल कार्यालयावर प्रेत घेऊन धडक दिली. पुरोगामी महाराष्ट्रात शरमेने खाली जावी अशी ही घटना घडली आहे.buldhana_news

वरवट बकाल येथील दलितांना स्वातंत्र्यापासून  हक्काची स्मशानभूमी नाही. आतापर्यंत गावातील राठोड नामक व्यक्तीच्या शेतात हे  लोक अंत्य संस्कार करत होते. मात्र, राठोड यांनी याविरोधात कोर्टात धाव घेतली होती. निकाल त्यांच्या बाजूने लागला. त्यामुळे या समाजाला हक्काची स्मशानभूमीच नाही. काल गावातील लीलाबाई बळीराम इंगळे या वृद्ध महिलेचे निधन झालं. अंत्य संस्कारासाठी गेलेल्या लोकांना राठोड यांच्याकडून मनाई करण्यात आली.

त्यानंतर इंगळे यांच्या नातेवाईकांनी वरवट बकाल-जळगाव जामोद रोडवर मृतदेह ठेऊन रास्तारोको आंदोलन केलं. तब्बल दोन तास वरवट बकाल-जळगाव रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पण एकही अधिकारी त्याठिकाणी फिरकला नाही.

त्यानंतर कंटाळून इंगळे कुटूंबियांनी मृतदेह घेऊन 5 किमी अंतरावर असलेले संग्रामपूर गाठलं. मृतदेहासह वरवट वासियांनी संग्रामपूर तहसिल कार्यालयावर धडक दिली आणि निषेध व्यक्त केला.

इंगळे कुटुंबियांनी लीलाबाई यांचा मृतदेह घेऊन तब्बल सहा तास पायपीट केली. अंत्य संस्काराला जागा मिळावी यासाठी कुटुंबियांना रास्तारोको आंदोलन करावं लागलं. अखेर यासंपूर्ण प्रकारची संग्रामपूरच्या तहसिलदारांनी दखल घेतली. अखेर तहसीलदारांनी वरवट बकाल गावातच एका शिवारात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा