माझा कुठल्याही पक्षावर आरोप नाही – कपिल शर्मा

September 9, 2016 9:07 PM0 commentsViews:

Kapil_Sharma_PTI

09 सप्टेंबर :  कपिल शर्मा यानं ट्विटरवरून केलेल्या लाचखोरीच्या आरोपाचे तीव्र पडसाद आज दिवसभर मुंबईत उमटत आहेत. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण लागत असल्याचं पाहून कपिलनं आता यू टर्न घेतला आहे. मी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता, कुठल्याही राजकीय पक्षाविरोधात मी बोललेलो नाही, असं त्याने स्पष्ट केलं आहे.

ऑफिससाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी महापालिका अधिकाऱ्याने पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा दावा त्यानं केला होता. “मी 15 कोटींचा आयकर भरतो, पण मला माझ्या ऑफिसचं काम करण्यासाठी 5 लाखांची लाच द्यावी लागते”, असं ट्विट त्यानं केलं होतं. विशेष म्हणजे, या ट्विटमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच टॅग करून, ‘हेच का तुमचे अच्छे दिन?’ असंही त्यानं विचारलं होतं. तसंच या संदर्भात,  IBN लोकमतशी बोलताना शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांवरनीही लाचखोरी प्रकरणात मध्यस्थी केल्याचा आरोप कपिलनं केला होता. त्यानंतर राजकीय धुरळा उडाला. कपिल शर्मानंच बेकायदेशीररित्या त्याच्या बंगल्याच्या मागची जागा बळकावली असल्याचं महापालिकेतर्फे सांगण्यात आलं.

त्यानंतर महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कपिल शर्माला आरोप आरोपांचे पुरावे देण्याचं आव्हान केलं आहे. पुरावे न दिल्यास त्याला मुंबईत शुटिंग करू दिलं जाणार नाही, असा इशारा खोपकरांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण लागत असल्याचं पाहून कपिलनं सावध पवित्रा घेत, दिवसअखेर पुन्हा एकदा ट्विट करून वादावर पडदा टाकायचा प्रयत्न केला. मी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता, कुठल्याही राजकीय पक्षाविरोधात मी बोललेलो नाही, असं त्याने स्पष्ट केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा