रत्नागिरीतील कुष्ठरोग हॉस्पिटल भग्नावस्थेत

April 16, 2010 2:51 PM0 commentsViews: 63

दिनेश केळुसकर, रत्नागिरी 16 मार्च सरकारच्या कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यक्रमामुळे कुष्ठरोगी आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कुष्ठरोग्यांचे हाल काही कमी झालेले नाहीत. रत्नागिरीच्या सरकारी कुष्ठरोग हॉस्पिटलची अवस्था अशीच 'खालावलेली' आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेले हे हॉस्पिटल आता आता शेवटच्या घटका मोजत आहे.दिनशॉ पेटीट या दानशूराने 135 वर्षांपूर्वी बांधून दिलेली हॉस्पिटलची इमारत आता भग्नावस्थेत आहे. राज्यातील फक्त तीन सरकारी कुष्ठरोग हॉस्पिटलपैकी एक आहे. केवळ नाईलाज म्हणून आठ कुष्ठरोगी सध्या इथे उपचार घेत आहेत. छप्पर तुटलेले, इलेक्ट्रीक वायरींगही धोकादायक झालेले, पाण्याची सोय नाही , लेप्रसी टेक्निशियन नाही आणि आवारात सरकारच्याच गाड्यांचे भंगार…दुसरीकडे चहासाठी साखर तर नाहीच पण, मिळणारे तुटपुंजे धान्यही अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. पेशंटच्या मनाला उभारी येण्यासारखे इथे काहीही नाही. 135 वर्षं पूर्ण झालेल्या या हॉस्पिटलचा कारभार चालतो तो येथील कर्मचार्‍यांचा सेवाभाव आणि दयाळू लोकांच्या मेहरबानीवर. या हॉस्पिटला उर्जितावस्था देण्याची सरकारची मात्र मानसिकता नाही. राज्यात कुष्ठरोग्यांचे प्रमाण तसे कमी आहे. दर दहा हजारांमागे एखादा पेशंट आढळतो. पण तरीही केवळ सरकारी उदासिनतेमुळे उपचार घेत असलेल्या पेशंटची परिस्थिती हलाखीची आहे. आणि त्याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते ते रत्नागिरीत.

close