फूड प्रोडक्ट आणि कॉस्मेटिक्सपाठोपाठ पतंजली आता जीन्सही तयार करणार

September 11, 2016 1:59 PM0 commentsViews:

baba-ramdev_3

11 सप्टेंबर : आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आरोग्य, फार्मा आणि किराणापाठापोठ आता योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली कंपनीने गारमेंटच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. पतंजलीची ‘परिधान’ या नावाने स्वदेशी जीन्स पॅन्ट बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. यासाठी पतंजलीकडून 10 प्लॅन्टही उभारले जाणार आहेत.

‘स्वदेशी वेशभूषा हे आमचं ध्येय आहे. पण त्यासोबतच आम्ही विदेशी वेशभूषेला स्वदेशी बनवणार आहोत, त्यासाठी स्वदेशी जीन्स बनवून बाजारात आणण्याचा विचार केला आहे’, असं रामदेव बाबांनी पतंजलीकडून नागपुरात झालेल्या मीट द प्रेसमध्ये सांगण्यात आलं. सोबतच लवकरच स्वदेशी शूज बाजारात आणण्याचा विचार असल्याचंही पतंजलीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

नागपूर इथे मिहान प्रकल्पात पतंजली फूड अँड हर्बल पार्क 230 एकरांत उभारण्यात येत आहे. त्यात 1600 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून देश-विदेशांत उत्पादनांची निर्यात केली जाणार आहे. त्यामुळे नागपूर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे निर्यात केंद्र म्हणून विकसित होईल, असं रामदेवबाबा यांनी म्हटलं आहे. तसंच, याद्वारे 15 ते 20 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

लघु उद्योग, गृह उद्योग आणि कुटीरोद्योगाची सांगड घालून भविष्यात पतंजलीची उत्पादनं एक्सपोर्ट करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. येत्या एक ते दीड वर्षात पतंजलीची वार्षिक उलाढाल 50 हजार कोटींच्या घरात जाणार आहे. त्यामुळे पतंजली हिंदुस्तान युनिलिव्हर, कोलगेट, पेप्सी, कोकाकोला, आणि प्रोक्टर अँड गॅम्बलच्या तुलनेत मोठी कंपनी असेल असंही यावेळी सांगण्यात आलं. पतंजलीने मिळणारा 100 टक्के नफा सामाजिक कार्यात लावणार असल्याचं म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा