कावेरीचं पाणी पेटलं,बंगळुरूमध्ये जमावबंदी लागू

September 12, 2016 10:26 PM0 commentsViews:

12 सप्टेंबर : कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कावेरी पाणी तंट्याचा वाद पेटलाय. तामिळनाडूला पाणी सोडण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश कर्नाटकच्या जनतेला मान्य नाहीये. या आदेशाविरोधात आजही बंगळुरूमध्ये निदर्शनं करण्यात आली. निदर्शकांनी तामिळनाडूच्या नंबर प्लेट्स असलेल्या ट्रक्स, बसेस अशा 30 मोठ्या वाहनांची जाळपोळ केली. त्यामुळे या आयटी सिटीतलं जनजीवन विस्कळीत झालं.

या जनक्षोभामुळे आंतरराज्य बससेवा पुरवणार्‍या कंपन्यांचं आर्थिक नुकसान होतंय. शहरातली हिंसक निदर्शनं लक्षात घेऊन वातावरण निवळेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच 15 हजार अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आज दिवसभरात 200 जणांना ताब्यात घेण्यात आलं. दुसरीकडे, अमेरिकेनं नागरिकांना बंगळुरूमध्ये जाताना खबरदारी घेण्याचा सल्ला दिलाय.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आज आपल्या आधीच्या आदेशामध्ये बदल करून तामिळनाडूला सोडायच्या पाण्यामध्ये कपात केलीये. आधीच्या आदेशाप्रमाणे कर्नाटकने तामिळनाडूला 10 दिवस रोज 15 हजार क्युसेक वेगानं पाणी सोडणं आवश्यक होतं. आता मात्र, 20 सप्टेंबरपर्यंत रोज 12 हजार क्युसेक वेगानं पाणी सोडायचं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा