पॅराऑलिम्पिकमध्ये दीपा मलिकने रचला इतिहास, गोळाफेकमध्ये रौप्य पदक

September 13, 2016 10:09 AM0 commentsViews:

deepa malik

12 सप्टेंबर :  रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताची गोळाफेकपटू दीपा मलिकने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पॅरालिम्पिकच्या महिला ऍथलेटिक्समध्ये रौप्यपदक पटकावणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. रिओ पॅरालिम्पिकच्या गोळाफेक एफ53मध्ये तिने आपल्या सहाव्या प्रयत्नात 4.61 मीटरवर गोळाफेक करत रौप्यपदकावर नाव कोरलं. ही दीपाची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीदेखील ठरली.

बाहरिनच्या फातीमा नेधमने सुवर्णपदकावर कब्जा केला, तर ग्रीसच्या दिमित्रा कोरोकिडाला ब्राँझपदकावर समाधान मानावं लागलं. यापदकासह भारताची रिओ पॅरालिम्पिकमधील पदकांची संख्या तीन झाली आहे.

मणक्याला ट्युमर झाल्याने दीपा मलिकला कमरेच्या खाली अपंगत्व आले. दीपा मलिक ही सेना अधिकार्‍याची पत्नी असून ती दोन मुलांची आई देखील आहे. गोळाफेक व्यतिरिक्त दीपाने भालाफेक, मोटार शर्यत आणि पोहणे या प्रकारात सहभाग घेतला होता. मार्च 2016 मध्ये दुबईमध्ये झालेल्या आशियाई ओशियन स्पर्धेत दीपाने भालाफेकमध्ये सुवर्ण तर गोळाफेकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. खेळातील तिच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल भारत सरकारने तिला ‘अर्जून पुरस्कारा’ने सन्मानित केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा