‘मेट्रो-3’साठी आवश्यक जागा त्वरित हस्तांतरीत करा – मुख्यमंत्री

September 13, 2016 1:21 PM0 commentsViews:

345508-devendra-fadnavis-farmer

13 सप्टेंबर : कुलाबा-वांद्रे सिप्झ भुयारी मेट्रो प्रकल्पास विरोध करून त्याचा राजकीय फायदा उठवण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका आदेशानुसार जोरदार धक्का दिला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा देण्यास नकार देण्याचा मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेने केलेला ठराव रद्द करताना मेट्रोसाठी आवश्यक जागा त्वरित हस्तांतरीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिकेस दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मेट्रोची आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाची कोंडी करण्याचे शिवसेनेचे मनसुबे उधळले गेल्याचे बोलले जात आहे.

कुलाबा- वांद्रे- सिप्झ या 33.5 किलोमीटरचा मुंबईतला पहिल्याच भुयारी मेट्रो प्रकल्पाचे काम पुढील महिन्यात सुरू होत आहे. मात्र या मेट्रोमुळे गिरगाव, दादर भागातील लोक विस्थापित होत असल्याचा, तसेच आरे कॉलनीत मेट्रो कारशेडमुळे झाडांचे नुकसान होणार असल्याचा आरोप करत शिवसेनेने या प्रकल्पाविरोधात आवाज उठवला.

मुंबई महापालिकेत बहुमताच्या जोरावर सेनेनं या प्रकल्पाविरोधात ठराव आणला. मात्र, हा ठराव रद्द करत तातडीनं प्रकल्पाला जमीन द्या, असे आदेश मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले आहेत. 2019 पर्यंत ही मेट्रो सुरु करण्याचा भाजपचा मानस आहे.

दरम्यान, मेट्रोसाठी 17 भूखंड तात्पुरत्या स्वरूपात, तर 24 भूखंड कायम स्वरूपात मेट्रो कार्पोरेशनला हस्तांतरीत करावेत असे आदेशच नगरविकास विभागाने सोमवारी महापालिकेस दिले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा