कोल्हापुरात सापडला स्लेंडर लॉरिस

October 16, 2008 2:06 PM0 commentsViews: 4

16 ऑक्टोंबर, कोल्हापूर कोल्हापूरमध्ये स्लेंडर लॉरिस नावाचा प्राणी सापडला आहे. स्लेंडर लॉरिस म्हणजेच लाजवंती वानर. हा निशाचर आणि अतिशय लाजाळू प्राणी आहे. दिसायला छोटा असला तरी हा प्राणी पूर्ण वाढ झालेला आहे. त्याचा आकारच 8 इंचापर्यंतचा असतो. तो दक्षिणेत आणि श्रीलंकेच्या जंगलात आढळतो. महाराष्ट्राच्या जंगलामध्ये तो सहसा सापडत नाही. त्यामुळे कोल्हापूर शहरातल्या रुईकर कॉलनीमध्ये हा प्राणी कसा काय सापडला, याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय. जवळच असलेल्या दांडेलीच्या जंगलातून येणार्‍या लाकडांच्या ट्रकमधून तो आला असावा किंवा शिकार्‍यांनी त्याला या भागात सोडून दिलं असावं, असा संशय आहे. सध्या हा प्राणी वनखात्याच्या ताब्यात आहे. त्याला कात्रजच्या प्राणी अनाथालयात सोडण्याचा वनखात्याचे अधिकारी विचार करत आहेत.

close