धुळ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक

September 15, 2016 5:42 PM0 commentsViews:

धुळे, 15 सप्टेंबर : शहरासह जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. शहरातील गणेशोत्सवात सर्वात महत्वाचा आणि मानाचा गणपती म्हणून खुनी गणपतीची वेगळी ओळख आहे. शहरातील जुने धुळे परिसरातील मानाच्या खुनी गणपतीचं हे 123 वे वर्ष होतं. दरम्यान शहरातील जुने धुळे परिसरातून मानाच्या खुनी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला वारकरी संप्रदाय प्रमाणे मोठ्या थाटात सुरुवात झाली आहे.dhule_khuni_ganpati

खुनी गणपतीची चंदनाच्या पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक म्हणून खानदेशात खुनी गणपतीची मान्यता आहे. 1894 साली पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची लोकमान्य टिळकांनी सुरुवात केल्यानंतर शहरात ही पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला.

यावेळी विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोनगटात वाद झाले. या वाद दरम्यान इंग्रजांनी जमावावर बेछूट गोळीबार केला. अनेकांचं रक्त सांडलं. या घटनेचा निषेध म्हणून हिंदू मुस्लिम सर्व बांधव एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटशांचा निषेध केला. तेव्हापासून या गणपतीला खुनी गणपती असं नाव पडलं.

दरवर्षी खुनी मशिदीजवळ गणपती आल्यानंतर खुनी मशिदीतील मुस्लिम बांधव गणपतीची मोठ्या भक्तीभावाने आरती करतात. 1894 पासून सुरू असलेली ही परंपरा निरंत सुरू आहे. ढोल ताशे आणि डीजे न वाजवता पारंपारिक टाळ मृदंगाच्या तालात वारकरी सम्प्रदायाच्या पद्धतीने खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. यावेळी सर्व गणेश भक्त, अबाल वृद्ध, महिला पुरुष, या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन ताल मृदंगच्या गजरात नृत्य करतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा