600 मुलं मेली तर असू दे की; विष्णू सावरांची जीभ घसरली

September 16, 2016 1:28 PM0 commentsViews:

16 सप्टेंबर : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात कुपोषणात मुलाला गमावलेल्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आलेल्या सावरांनी कुपोषणामुळे मृत्यू होतात, मग असू दे की असं संतापजनक विधान केलं आहे. पालघरमध्ये कुपोषणामुळे लहान मुलांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी असंवेदनशील वक्तव्य करुन कुपोषणग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. विशेष म्हणजे कुपोषणग्रस्त भागातून निवडून गेलेले विष्णू सावरा हे पालघरचे पालकमंत्रीही आहेत.

Vishnu savara

पालघर जिल्ह्यात कुपोषणांच थैमान सुरू आहे. आतापर्यंत सात हजार हून अधिक मुलं कुपोषित असल्याची नोंद झाली असून 600 मुलांचा मृत्यू झाला आहे. एकटया मोखाडयात गेल्या 2 महिन्यात कुपोषणामुळे 18 बालकांचा मृत्यू झाला आहे. 30 ऑगस्ट रोजी तालुक्यातील सागर वाघ या मुलाचा कुपोषणानं मृत्यू झाला होता. त्यानंतर पंधरा दिवस उलटले तरीही आदिवासी विकास मंत्री सावरांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली नाही. माध्यमांनी बातमी लावून धरल्यानंतर अखेर विष्णू सावरांना जाग आली आणि ते सागर वाघ याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मोखाडा तालुक्यात पोहोचले. पण सागरच्या आईने सावारांची भेट घेण्यास नकार दिला आणि त्यांना दारातूनच हाकलून लावलं.

त्यानंतर जमलेल्या ग्रामस्थांनी जेव्हा सावरांना “सहाशे मुलांचा मृत्यू झाला, तुम्ही आत्ता येत आहात?” असा सवाल करायला सुरुवात केली. त्यावरून झालेल्या बाचाबाचीत सावरा यांनी “असू दे की” अशी मुक्ताफळं उधळली.

विष्णू सावरा यांच्या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. विष्णू सावरा यांचे विधान असंवेदनशील असून सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी केली आहे. तर सावरा यांचं वक्तव्य अत्यंत दुदैर्वी असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी दिली आहे.

दरम्यान, शुक्रवारीदेखील मोखाडा तालुक्यात कुपोषणमुळे आणखी एका मुलीचा मृत्यू झाला. पेठ रांजणीत कुपोषणामुळे एका चिमूरडीला जीव गमवावा लागला आहे. मोखाडा तालुक्यातील कुपोषणात आणखी एकाचा मृत्यू झाल्यावर सरकार दरबारी हालचाली होऊ लागल्या आहेत. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील हे 21 सप्टेंबररोजी जव्हार आणि मोखाड्याचा दौरा करणार आहेत. पण पालघरमधलं कुपोषणाचं हे हेलावणारं चित्र कधी आणि कसं बदलणार, हाच खरा प्रश्न आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा