शिवपाल यादव यांचा मंत्रीपद तसंच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

September 16, 2016 2:41 PM0 commentsViews:

samajwadi-party-war-lead

16 सप्टेंबर :  बाप्पाला निरोप दिला गेलाय पण देशपातळीवर सध्या एक शीतयुद्ध भडकलय आणि त्याचं विसर्जन करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी नाराजीचे फटाके फुटणं काही थांबताना दिसत नाहीय. उत्तर प्रदेशात यादवांमध्ये माजलेली यादवी आणखी वाढलेली दिसतेय. मुलायमसिंग यांचे भाऊ शिवपाल यादव यांनी आता समाजवादी पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद तसच मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. पण त्यांचा राजीनामा स्वीकारला नसल्याचं मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलंय.

राजीनामा दिल्यानंतर शिवपाल यादव यांनी त्यांच्या घरासमोर शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे शिवपाल यादव यांचा राजीनामा म्हणजे यादवांमध्ये जो काही वाद निर्माण झालाय तो मिटवण्याच्या प्रयत्नांना खीळ समजली जातेय. मुलायमसिंग स्वत: हा कौटुंबिक वाद मिटवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यात शिवपाल यादव यांनी अगोदर मुलायमसिंग यांची भेट घेतलेली होती. त्यानंतर ते अखिलेश यादव यांनाही भेटलेले होते. पण तरीसुद्धा शिवपाल यादव यांनी राजीनामा दिल्यानं उत्तर प्रदेशातलं यादवांमधला वाद इतक्यात मिटण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. आपण राजीनामा दिला असला तरी मुलायमसिंग यादव हेच माझे नेते आहेत. त्यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम आहे असं शिवपाल यादव यांनी सांगितलं.

दरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यात कोणतेही मतभेद नसून समाजवादी पक्ष आपल्या नैतृत्वाखाली काम करत असल्याचं ठासून सांगितलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा