‘व्हॅट’ लागली ; पेट्रोल, इलेक्ट्राॅनिक वस्तू महागणार

September 16, 2016 10:20 PM0 commentsViews:

16 सप्टेंबर : राज्यात व्हॅट अर्थात मुल्यवर्धित करांमध्ये 1 टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 12.5 टक्क्यांवरुन ही वाढ आता 13.5 टक्के होणार आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात 2 रुपयांची वाढ होणार आहे. तर डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. पेट्रोलसोबतच  वाहनांचे सुटे भाग, इलेक्ट्राॅनिक वस्तू, फर्निचर महागणार आहे.

vat_hikeमहागाईने होरपळणाऱ्या सर्व सामान्यांच्या खिश्यावर राज्यसरकारने आता आणखी बोजा टाकला आहे.  राज्यातील मुल्यवर्धित करांतर्गत स्टैंडर्ड कराचा दर 12.5 टक्क्यांवरुन 13.5 टक्के तर निम्न कराचा दर 5.5 टक्क्यांवरुन सहा टक्के करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. तसंच पेट्रोल वरील विक्रीकराचा दर दीड रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आला असून डिझेलच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पेट्रोलवरील वाढीव करदरानंतरही राज्यातील पेट्रोलची किरकोळ विक्री किंमत जवळपास जून 2016 मधील विक्री किंमतीइतकीच असणार आहे.

व्हॅटमध्ये 1 टक्का वाढ झाल्यामुळे दुचाकी आणि मोटार वाहने, वाहनांचे सुटे भाग, पेट्रोलियम वस्तू जसे वंगण, ऑईल महागणार आहे. तसंच इलेक्ट्रॉनिक वापरण्याच्या वस्तू जसे टी.व्ही, फ्रिज, आणि फर्निचर वस्तू, शोभेच्या वस्तू यांचाही समावेश असणार आहे.

तर व्हॅट अंतर्गत 5.5टक्के कराची आकारणी होणाऱ्या वस्तूंवर आता 6 टक्के कर आकारणी होणार आहे. त्यातील महत्त्वाच्या वस्तूंमध्ये विटा, बांबू, सायकल, नॉन फेरस मेटल, पेपर, होजियरी वस्तू, मसाले, मिठाई आणि फरसाण, प्रक्रिया केलेली फळे आणि भाज्या, औषधे, खेळाचे साहित्य,तंत्रज्ञान वस्तू, दूधाची भुकटी, छत्र्या, लिखाणाचे साहित्य यांचा समावेश आहे.

करमाफी असलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या कर आकारणीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यात शेतीस उपयुक्त अवजारे, दिव्यांग व्यक्तींसाठीची साधने, पुस्तके, जनावरे, कुक्कुट आणि मासे यांचे खाद्य, गहू, ज्वारी, तांदूळ आणि त्याचे पीठ, डायलिसीस आणि कॅन्सरवरील औषधे, दूध, भाजीपाला, फळे, फुले, जैविक खते, सर्व प्रकारचे सीडस्, साखर, मिरची, हळद, नारळ, सोलापुरी चादर आणि टॉवेल, मनुके बेदाणे, अगरबत्ती यांचा समावेश आहे.

इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात व्हॅट कमीच आहे असा दावा राज्य सरकारने केलाय. बिहारमध्ये 15 टक्के तर शेजारील गुजरातमध्ये 15 टक्के व्हॅट आकारला जातो. त्या तुलनेत राज्यात आता 13.5 टक्के व्हॅट आकारला जाणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा